Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पारू’ मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून या सिरियलला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पारूचा टीआरपी सुद्धा चांगला होता. जानेवारी महिन्यात वाहिनीवर ‘शुभ श्रावणी’ ही नवीन मालिका सुरू झाली. त्यामुळे ‘पारू’ची वेळ बदलण्यात आली. ‘पारू’ मालिका रात्री ११ वाजता प्रसारित होऊ लागली. रात्री उशिराच्या स्लॉटला प्रसारित होऊन सुद्धा ‘पारू’ला खूप चांगला टीआरपी मिळत होता.
पण, अचानक या मालिकेचं प्रसारण थांबवण्यात आलं आहे. १० फेब्रुवारीनंतर ‘पारू’ मालिकेचा एकही भाग ऑन एअर झालेला नाहीये. याशिवाय ‘पारू’चं कथानक सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. अचानक मालिकेचं प्रसारण बंद झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यापूर्वी एखादी मालिका काही कारणास्तव विश्रांती घेणार असेल तरीही आधी प्रोमो प्रदर्शित केला जायचा. पण, ‘पारू’च्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. ‘पारू’ मालिकेच्या एपिसोड्सचं प्रसारण अचानक बंद झालं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अपरिहार्य कारणांमुळे आणि आव्हानांमुळे ही मालिका काही काळ विश्रांती घेणार आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. अंतिम भागाच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख प्रेक्षकांना लवकरच कळवली जाईल. ‘पारू’ मालिकेवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल झी मराठी… सर्व कलाकार आणि प्रेक्षकांची ऋणी आहे. झी मराठी नेहमीप्रमाणे उत्तम शो आणि उत्तम मनोरंजन घेऊन येत राहण्यासाठी वचनबद्ध आहे! असं स्पष्टीकरण याबाबत देण्यात आलं आहे.
आता काही कारणास्तव ‘पारू’ मालिकेचा अंतिम भाग झी मराठीच्या दुसऱ्या मालिकेबरोबर महासंगम करून प्रसारित केला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता ‘पारू’ संपल्यावर रात्री ११ वाजता कोणत्या मालिकेचा रिपीट टेलिकास्ट प्रसारित केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
