Paaru Serial : ‘झी मराठी’च्या पाच मालिका या आठवड्यात स्लॉट लीडर ठरल्या आहेत. सध्या वाहिनीवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण, अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं बोललं जात आहे. याबाबत ‘झी मराठी’ने अधिकृत कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. पण, १० फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाहीये. Zee 5 वर सुद्धा ‘पारू’चे १० फेब्रुवारीनंतरचे भाग उपलब्ध नाहीयेत. यावरून ‘पारू’ मालिका ऑफ एअर झाल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
‘पारू’ मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री शरयू सोनावणेने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीजनी देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ‘पारू’ मालिका अचानक ऑफ एअर झाल्याचं बोललं जातं आहे.
‘पारू’ मालिका सर्वांचा निरोप घेणार, याच्या अंतिम भागाचा प्रोमो अशी कोणतीही अपडेट ‘झी मराठी’कडून शेअर करण्यात आलेली नाही. याशिवाय सेटवर शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडीओ देखील समोर आलेले नाहीयेत. Zee5 वर ६, ७ आणि ८ फेब्रुवारीचे पारू मालिकेचे भाग अपलोड झालेले नाहीयेत. याबाबत सोशल मीडियावर देखील पारूच्या टीमला विचारणा करण्यात आली होती.
यानंतर ९ आणि १० फेब्रुवारीला मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आणि दहा तारखेला ऑन एअर झालेला एपिसोडच पारू मालिकेचा शेवटचा भाग ठरला आहे.
पारूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शरयू सोनावणेने काही फॅनपेजेसच्या इन्स्टाग्राम पोस्ट रिशेअर केल्या आहेत. यामध्ये, “आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाहीये खूप भरून आलंय.”, “थँक्यू प्रसाद दादा आणि शरयू ताई तुमच्या मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील” असे मेसेज लिहिण्यात आले आहेत. यामुळेच मालिका अचानक संपली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ‘पारू’ मालिका ‘शुभ श्रावणी’ सुरू झाल्यापासून रात्री ११ वाजताच्या स्लॉटला ऑन एअर केली जात होती. रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता. त्यामुळे पारू मालिका का संपली याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
पारू मालिकेत शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, श्वेता खरात या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेला नुकतीच २ वर्षे पूर्ण झाली होती. याशिवा दोन्ही वर्षे पार पडलेल्या झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला सुद्धा या सिरियलने घवघवीत यश मिळवलं होतं. आता याबाबत वाहिनी केव्हा स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

