Sanai Chaughade Fame Actress Sharvari Parab : ‘सनई चौघडे’ या मालिकेच्या निमित्ताने ‘झी मराठी’वर चिन्मयी साळवीची एन्ट्री झाली अन् अल्पावधीतच ती शर्वरी परब म्हणून घराघरांत पोहोचली. लीड अभिनेत्री म्हणून मराठीत चिन्मयीची ही पहिलीच मालिका आहे. यंदा तिला पुरस्कार सोहळ्यात अनेक नामांकनं मिळाली होती. यापैकी एकूण तीन पुरस्कारांवर चिन्मयीने आपली मोहोर उमटवली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट नायिका!
‘सर्वोत्कृष्ट नायिका’ होणं हे चिन्मयीसाठी स्वप्नवत होतं. रंगमंचावर सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून नाव घोषित होताच सुरुवातीला तिचा विश्वासच बसला नाही. पुरस्कार जिंकल्यावर भावना व्यक्त करत ती म्हणाली, “हा माझा अभिनयासाठीचा पहिला पुरस्कार आहे. खरंतर, बसल्या जागेवरून रंगमंचावर येण्यासाठी खूप कमी वेळ लागला. पण, इथपर्यंत येण्यासाठीचा प्रवास फार मोठा होता…तो सगळा प्रवास डोळ्यासमोरून गेला. मला खरंच वाटत नव्हतं की, माझं नाव या पुरस्कारासाठी अनाऊंस केलंय. झी मराठी थँक्यू सो मच! माझ्या संपूर्ण ‘सनई चौघडे’ टीमचे आभार. त्यांच्यामुळे आज मी इथवर पोहोचले.”
चिन्मयी पुढे म्हणाली, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आई-बाबा. ते आता इथे नाहीयेत, मलाही त्यांच्याकडे बघून माझं मनोगत व्यक्त करायचं होतं. हे स्वप्न माझ्या एकटीचं नव्हतं…माझ्या संपूर्ण कुटुंबाचं होतं. या रंगमंचावर परफॉर्म करायचं हे माझं स्वप्न होतं. मी जेव्हा लहान होते…तेव्हापासून मी हा पुरस्कार सोहळा यासाठी पाहायचे की, अभिनेत्री कशा डान्स करतात. आज झी मराठीने माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण केलंय. थँक्यू सो मच!”
“आज मी इथे आहे, त्यामागे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. त्यामुळे हा आनंद जितका माझा आहे, तितकाच तुमचाही आहे. हा पुरस्कार जितका माझा आहे, तितकाच तो माझ्या टीमचा, माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.” असं चिन्मयीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, चिन्मयी साळवीवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर चिन्मयीचं घरीही जंगी स्वागत करण्यात आलं. तिचं औक्षण करून कुटुंबीयांनी डान्स करत हा आनंद साजरा केला. यानंतर चिन्मयीने जिंकलेले दोन्ही पुरस्कार मंदिरात देवासमोर ठेवून पूजा केल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
