Zee Marathi Sanai Chaughade Promo : ‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच ‘सनई चौघडे’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. या मालिकेत नव्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. तर, काही जुन्या लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

‘सनई चौघडे’ या मालिकेचं कथानक आई अन् तिच्या चार मुली यांच्याभोवती फिरणार आहे. या चार मुलींची भाबडी आई सतत जावयाच्या शोधात असते, मालिकेत आईच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री मेघना एरंडे झळकणार आहे. याशिवाय या मुलींच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुहास शिरसाट साकारणार आहेत. यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या दत्ताच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये. पण, ही मालिका एका गाजलेल्या आणि टीआरपी टॉपर असलेल्या कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘झी कन्नडा’वर ‘गट्टीमेळा’ ही मालिका २०१९ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेचा मराठी रिमेक आपल्याला ‘सनई चौघडे’च्या रुपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. ‘सनई चौघडे’चा पहिला प्रोमो सुद्धा कन्नड मालिकेप्रमाणे हुबेहूब कट करण्यात आला आहे. आता मराठीत या सिरियलला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘सनई चौघडे’मध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता राज हंचनाळे आणि ‘वागळे की दुनिया’ फेम लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आता या मालिकेला ‘झी मराठी’वर कोणता स्लॉट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘सनई चौघडे’प्रमाणे दीप ज्योती या मालिकेची घोषणा सुद्धा वाहिनीकडून करण्यात आली आहे. सध्या ‘झी मराठी’च्या बहुतांश सगळ्याच मालिकांना चांगलं रेटिंग मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘सनई चौघडे’कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.