गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. याच पारंपरिक आणि उत्साही वातावरणाची झलक आता ‘सनई चौघडे’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. यावर्षी सनई चौघडे मालिकेतील ‘परब’ कुटुंब गणपतीच्या उत्सवासाठी गावी जाणार आहे. त्यांच्यासह खानोलकर कुटुंबीय सुद्धा गावी पोहोचणार आहेत. हरतालिकेचं पूजन, कार्यशाळेतून गणपतीचं आगमन, गावातली आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं गणपती विसर्जन अशा अनेक प्रसंगांमधून कोकणातला गणेशोत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या गणेशोत्सवाच्या शूटिंगचा अनुभव शर्वरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी साळवीने शेअर केला आहे. ती म्हणते, “माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास आहे. मी पहिल्यांदाच कणकवलीला गेले होते आणि मला माझ्याच गावी आल्यासारखं वाटलं. कारण, माझं गाव सुद्धा कोकणातच संगमेश्वरला आहे. शूटिंगचं काम खूप होतं, पण अजिबात स्ट्रेस किंवा हेक्टिक वाटलं नाही. गणपतीच्या सुट्टीला गावी आल्यासारखं वाटलं, खूप मजा-मस्ती करत आम्ही शूटिंग एन्जॉय केलं.”

parab family kokan
परब कुटुंबीय पोहोचले गावी

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकप्रमाणे आम्ही आता परब कुटुंबीय आमच्या गावी आलोय. त्यामुळे पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याबद्दल जास्त रिव्हील करू शकत नाही. पण प्रेक्षकांना हा ट्रॅक नक्कीच खूप आवडेल! कोकणातला पाऊस म्हणजे कधीही सुरू होतो आणि कधीही थांबतो. त्यामुळे आमचं शूटिंग थोडं हवामानावर अवलंबून होतं. टीम खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्लॅन करत होती. आउटडोअर शूट असल्यामुळे साधारण १२ ते १५ तास काम होतं आणि कधी-कधी त्यापेक्षाही जास्त वेळ जातो. पावसामुळे अर्थातच काही अडचणी येतात. कधी लोकेशनवर पोहोचणं, कधी कंटिन्युइटी मेंटेन करणं, तर कधी अचानक पाऊस आल्यामुळे टेक थांबवावा लागतो. पण टीम इतकी को-ऑपरेटिव्ह आहे की त्या अडचणीही एन्जॉय करतच पार पडल्या.”

jay sharvari sanai chaughade
जय-शर्वरी ( सनई चौघडे मालिका ) कोकणात शूटिंग

“आमचा शेवटचा दिवस बीचवर शूटिंगचा होता आणि त्यादिवशी आम्ही सगळ्यात जास्त धमाल केली. तिथलं जेवण इतकं भारी होतं आणि भजन, आरती, डबल बारी भजन ठेवलं होतं, त्यात तर पूर्ण युनिटने खूप एन्जॉय केलं. आम्ही अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचलो आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे फुल एनर्जीमध्ये होते. अशीच धम्माल-मस्ती करत, फुल एनर्जीने आम्ही हे संपूर्ण शूट केलंय आणि ही एनर्जी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे.”

jay sharvari sanai chaughade
जय-शर्वरी ( सनई चौघडे मालिका ) कोकणात शूटिंग

कोकणतील निसर्गरम्य वातावरण, गावाकडची माणसं, पारंपरिक पद्धतीने होणारा गणेशोत्सव आणि त्यातला उत्साह यामुळे मालिकेतील हा गणेशोत्सवाचा ट्रॅक नक्कीच खास ठरणार आहे. परब आणि खानोलकर कुटुंबाच्या या गावच्या मुक्कामात नेमकं काय घडणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.