Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सातत्याने ट्विस्ट येताना दिसतात. कधी सारंग व सावली यांची मैत्री भुरळ घालते, तर कधी तिलोत्तमाच्या निर्णयाचे सारंग व सावली यांच्या नात्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळतात.
अनेकदा भैरवी सावलीला व तिच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याचे पाहायला मिळते. सावली भैरवीची मुलगी तारासाठी गाते. सावलीचा आवाज भैरवीकडे गहाण आहे. त्या बदल्यात भैरवी सावलीच्या भावाच्या आजारपणासाठी पैसे देते. पण, ती अनेकदा सावलीला त्रास देतानादेखील दिसते. जर सावलीकडून काही चूक झाली तर तिला शिक्षा देताना दिसते. आतापर्यंत सावली भैरवीचे अत्याचार निमूटपणे सहन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तुमच्या लेकीमुळे माझ्या ताराला…
काही दिवसांपूर्वीच स्वरयज्ञ ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये तारादेखील सहभागी झाली होती. तारा गायन करण्याचे नाटक करते, मात्र ते गाणे सावली गात असते. जगन्नाथने भैरवीला तारा ही स्पर्धा जिंकू शकणार नाही, अशी धमकी दिली होती, त्याप्रमाणे जगन्नाथने सावलीच्या पाण्यात औषध टाकले, त्यामुळे ताराचा गाण्याचा नंबर आला, सावलीने गाणे म्हणण्यास सुरूवात केली आणि तिचा आवाज गेला. त्यामुळे तारा ही स्पर्धा जिंकू शकली नाही. त्यानंतर भैरवीला अपमानित झाल्यासारखे वाटले. आता भैरवी याचा बदला म्हणून सावलीच्या कुटुंबाला त्रास देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, सावलीचे वडील पांडुरंगापुढे हात जोडून रडत आहेत. ते म्हणतात की, माझ्या सखदेवाच्या नशिबात हा चोरीचा आळ कधी पुसणार आहे. तितक्यात भैरवी येते. ती म्हणते, मी तुम्हाला असा कलंक लावायला आले आहे की तो आयुष्यभर पुसला जाणार नाही. तुमच्या लेकीमुळे माझ्या ताराला हार पत्करावी लागली आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की बरोबर असलेल्या गुंडांना ती म्हणते, अरे ऐ यांचं सामान बाहेर फेका. त्यानंतर ते गुंड घरातून सामान बाहेर फेकतात. पुढे सावली म्हणते की, भैरवी माई जर तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर ही सावली तिचा आवाज वाढवू शकते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “भैरवीच्या समोर वाढणार सावलीचा आवाज”, अशी कॅप्शन दिली आहे. आता भैरवीने केलेल्या या कृतीचे सावली कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.