Savalyachi Janu Savali Promo: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या स्वरयज्ञ ही स्पर्धा सुरू आहे. या गाण्याच्या स्पर्धेत भैरवीची मुलगी तारादेखील सहभागी झाली आहे. सावली तारासाठी गाते. तारा फक्त गाlत असल्याचे नाटक करते.
भैरवीच्या मुलीला ताराला गाता येत नाही. मात्र, भैरवीला तिची गाण्याची कौटुंबिक परंपरा पुढे न्यायची आहे. यावर भैरवीने उपाय शोधला. गरजू, गरीब असलेल्या आणि आवाजाची देणगी लाभलेल्या सावलीचा आवाज ती गहाण ठेवते. त्या बदल्यात तिला तिच्या लहान भावाच्या आजारपणासाठी पैसे देते, त्यामुळे ज्या ताराच्या आवाजावर श्रोते प्रेम करतात, तो आवाज खरेतर सावलीचा आहे, हे अगदी कमी लोकांना माहीत आहे.
सावलीचे कुटुंब, भैरवी-तारा आणि जगन्नाथ व त्याची पत्नी यांनाच सावलीच्या आवाजाचे सत्य माहीत आहे. जगन्नाथला तारा व भैरवीचा खोटेपणा जगासमोर आणून सावलीला तिची ओळख मिळवून द्यायची आहे. उपकाराच्या नावाखाली भैरवी सावलीला ज्या प्रकाराची वागणूक देते, त्यातून तिला सुटका करायची आहे. त्यासाठी तो सतत प्रयत्न करताना दिसतो. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जगन्नाथने तारा-भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी एक योजना केल्याचे पाहायला मिळत आहे.
सावलीचा आवाज जाणार अन्…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धक, श्रोते जमलेले आहे. जगन्नाथ व त्याची पत्नीदेखील तिथे आले आहेत. जगन्नाथची पत्नी त्याला विचारते की, मला कळत नाही की आज तुम्ही जज नसताना, ताराला जिंकण्यापासून रोखणार आहात? त्यावर जगन्नाथ म्हणतो, “अलका, कुस्तीत एक डाव कायम राखून ठेवायचा असतो. त्याचवेळी दिसते की, सावलीच्या खोलीत एक व्यक्ती पाणी घेऊन जातो, त्यात कसलेतरी औषध टाकलेले असते. सावली ते पाणी पिते, त्यानंतर तिचा घसा बसतो.
ताराला जज विचारतात की तू गाणं गाणार आहेस? त्यावर तारा सांगते, मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे गाणार आहे. त्यानंतर ती गायला सुरुवात करते. सावली गाण्याचा प्रयत्न करते, पण सावलीचा आवाज बाहेर पडत नाही; त्यानंतर तारा गोंधळलेली दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जगन्नाथची नवी खेळी तारा आणि भैरवीला देऊ शकेल का मात?”, अशी कॅप्शन दिली आहे.
याबरोबरच, अस्मीलादेखील भैरवीचे सावलीकडे सतत काय काम असते असा प्रश्न पडल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे ती आता सावलीवर नजर ठेवणार असल्याचे ती म्हणताना दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.