Savalis Stunning Entry at Sarang And Asmis Wedding: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका विविध कारणांनी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सावलीने सारंगसाठी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तिलोत्तमाने लगेचच सारंगचे अस्मीबरोबर लग्न ठरवले. तसेच, तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन सावली व जगन्नाथच्या मदतीने सोहम व ताराने लग्नगाठ बांधली.
सारंग व अस्मीच्या लग्नात सावलीची घोड्यावरून जबरदस्त एन्ट्री
आता ‘सावळ्याची जणू सावली‘ या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली त्या व्यक्तीजवळ पोहोचते. जो तिला सारंगला मारण्याच्या धमक्या देत होता. ती आकारजवळ जाते आणि त्याला म्हणते, “आकार तूच सारंगसरांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेस”, असे म्हणत ती त्याच्या कानाखाली मारते. पुढे ती त्याला विचारते की, हे सगळं तू का करतोयस? त्यावर आकार म्हणतो की, हे सगळं मी त्या अस्मीच्या सांगण्यावरून केलं.
तितक्यात काही गुंड तिथे येतात आणि सावलीकडे बघून म्हणतात की, इथे लपून बसला आहात का? तो चाकूने सावलीला मारण्यासाठी जातो. तितक्यात सावलीचा मानलेला भाऊ आणि पोलीस अधिकारी देवा येतो. तो त्या गुंडाला बाजूला सारतो. तसेच देवा त्याचा डायलॉगदेखील म्हणताना दिसत आहे. तो म्हणतो की आला रे आला, आता देवा आला. पुढे तो गुंडाशी मारामारी करताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अस्मी व सारंगचे लग्न पार पडत आहे. सारंगच्या घरातील सर्व मंडळी या लग्नाला उपस्थित आहेत. तिलोत्तमा, अस्मी व ऐश्वर्या यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तितक्यात सावली घोड्यावर बसून सारंगच्या घरी येते. ती जेव्हा पोहोचते तेव्हा सारंग अस्मीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. तितक्यात सावली ओरडून थांबा म्हणते. तिला पाहून अस्मीला धक्का बसतो. सावली म्हणते, “अस्मी, आता तुझा खेळ खल्लास.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घोड्यावर होऊन स्वार, सावली करणार असत्याचा संहार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सारंग व सावलीचे लग्न हे जगन्नाथमुळे झाले होते. सारंग व सावलीच्या मनाविरुद्ध हे लग्न झाले होते. तिलोत्तमा व ऐश्वर्या यांना सावली, तिचा रंग तिच्या माहेरची गरिबी या सगळ्याचा राग येतो. त्यांना सारंगचे लग्न अस्मीबरोबर लावायचे होते. त्यामुळे सावली जेव्हा सून म्हणून घरात आली, तेव्हा तिला वाईट वागणूक देण्यात आली. मात्र, कालांतराने सावली व सारंगची चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सारंगच्या जीवाला धोका, असे सांगून सावलीकडून घटस्फोटाच्या पेपरवर सावलीला सह्या करण्यास भाग पाडले होते. हे सर्व अस्मीने घडवून आणले होते. कारण- तिला सारंगबरोबर लग्न करायचे होते. आता सावलीला या रूपात पाहून मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.