Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या आषाढी एकादशी वारीचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. सावलीचे आई-बाबा वारीसाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सावली व तिचे कुटुंब विठ्ठलाचे भक्त आहेत. सुख-दु:खात ते विठ्ठलाकडे आशेने पाहतात. सावलीचीदेखील विठ्ठलावर खूप भक्ती आहे. सावलीचे आई-बाबा दिडींतून वारीसाठी जात असताना सावलीचे वडील आजारी पडतात. सावली विठ्ठलाकडे प्रार्थना करते. त्यानंतर सारंग सावलीच्या आई-वडिलांना कावडमध्ये बसवतो. ती कावड खांद्यावर घेतो आणि त्यांची वारी पूर्ण करतो. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
“आजवर मी खूप श्रीमंती पाहिली…”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली, तिचे आई-बाबा आणि सारंग पंढरपुरात पोहोचले आहेत.
पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर सावलीचे बाबा भावुक होतात. ते सांरगपुढे हात जोडतात आणि रडत म्हणतात, “आमच्या पांडुरंगानं स्वत:च्या खांद्यावर आम्हाला घेऊन आमची वारी पूर्ण केली”, त्यांचे बोलणे ऐकून सारंग म्हणतो, “माझ्या मनात बरेच प्रश्न होते. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आजवर मी खूप श्रीमंती पाहिली. आज माझ्या खिशात काहीच नाही. पांडुरंगाला भेटल्याचं समाधान मी माझ्याबरोबर घेऊन चाललो आहे”, असे म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर पांडुरंगाच्या नामाचा जयघोष होताना दिसत आहे. या संवादादरम्यान सावलीदेखील भावूक झालेली दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पूर्ण होणार पंढरीची वारी, सारंग पोहोचणार विठूरायाच्या दारी”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मालिकेचे कौतुक केले आहे. “राम कृष्ण हरी”, “सुपरहिट मालिका. राम कृष्ण हरी”, “अक्षरश: अंगावर काटा आला”, “असा जावई सगळ्यांना मिळो”, “खूप छान. सुंदर”, “ही मालिका एक नंबर आहे. अप्रतिम आहे. मालिकेची कथा छान रेखाटली आहे आणि कलाकारांनी त्यांच्या कमाल अभिनयाने त्यांच्या भूमिका छान रेखाटल्या आहेत.”






दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे