Marathi Celebrity Sisters : मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच एक सख्ख्या बहिणींची जोडी आहे. आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून लहान बहिणीने आपले स्थान निर्माण केलं आहे. मराठी कलाविश्वात आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या विविध मालिका व सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात त्या यशस्वीही झाल्या आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वातल्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्या कोण आहेत? चला जाणून घेऊ…

पल्लवी वैद्य व पूर्णिमा तळवळकर आहेत सख्ख्या बहिणी

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या अभिनेत्री आणि सख्ख्या बहिणी म्हणजे पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर. दोघी सध्या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

पूर्णिमा तळवलकर ही झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिच्या भूमिकेचं नाव नर्मदा असं आहे. तर अभिनेत्री पल्लवी वैद्य ही ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय आणि यात तिच्या भूमिकेचं नाव रेणुका असं आहे.

पूर्णिमा आणि पल्लवी यांनी विविध मुलाखतींमधून त्यांच्यातील खास नात्याबद्दल सांगितलं आहे. अशाच एका मुलाखतीत पूर्णिमाने पल्लवीच्या बालपणीच्या खोडकरपणाचा एक किस्सा शेअर केला होता. यावेळी पूर्णिमा म्हणालेली, “मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांना ती खूप त्रास द्यायची. तिची नखे लहान असल्याने ती आम्हाला बोचकारायची. त्यात मी आणि भाऊ दोघे जरा गोरे आणि आमचे डोळेसुद्धा घारे होते. याचा पल्लवीला त्रास व्हायचा. पाहुणे मंडळी यायची तर तेव्हा तेही आमच्याबद्दल तिला चिडवायचे. यामुळे तिला आमचा राग यायचा.”

पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर यांचा एकत्र फोटो

दरम्यान, पल्लवी आणि पूर्णिमा या दोघींनी याआधी विविध मालिकांतून काम केलं आहे. पूर्णिमाबद्दल सांगायचं झालं तर तिने होणार ‘सून मी ह्या घरची’, ‘मन उडू उडू झालं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘फुलपाखरू’, ‘हृदयी प्रीत जागते’सह अनेक मालिकांत काम केलं आहे. तसंच तिने काही मराठी आणि हिंदी चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

तसंच पल्लवी वैद्यने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अशा मालिकांत काम केलं आहे. दोघी बाहिणी सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघी एकमेकींबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतात.