Marathi Serial TRP : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. गेली तीन वर्षे ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. नुकताच ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीतील टीआरपी BARC इंडियाकडून जाहीर करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे या यादीत ५.७ रेटिंगसह सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. मात्र, यंदा टॉप-१० मालिकांच्या यादीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेली काही वर्षे टीआरपीच्या यादीत टॉप- १० मध्ये सर्वाधिक ‘स्टार प्रवाह’च्या मालिका असायच्या. मात्र, गेल्या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये ‘झी मराठी’च्या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर जानकी-हृषिकेशची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. यानंतर चौथं स्थान ‘कमळी’ने पटकावलं आहे. आदिनाथ कोठारेच्या ‘नशीबवान’ मालिकेला अन् ‘कमळी’ला गेल्या आठवड्यात ४.२ हे सारखंच रेटिंग मिळालं आहे.

यानंतर, पाचव्या स्थानी तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका आहे. या मालिकेने पहिल्यांदाच ४.० एवढं रेटिंग मिळवत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतलेली आहे. ‘तारिणी’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांना सुद्धा सारखंच रेटिंग मिळालं आहे.

‘स्टार प्रवाह’च्या महत्त्वाच्या आणि गेली काही महिने टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असणाऱ्या मालिकांचं रेटिंग गेल्या काही आठवड्यांमध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका टीआरपीच्या यादीत कायम टॉप-५ मध्ये असायची. मात्र, ही मालिका आता ३.८ रेटिंगसह सातव्या स्थानी आहे. तर, राया-मंजिरीची ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका आठव्या स्थानी आहे.

मराठी मालिकांचा टीआरपी

१. ठरलं तर मग – ५.७
२. तू ही रे माझा मितवा – ५.०
३. घरोघरी मातीच्या चुली – ४.४
४. कमळी – ४.२
नशीबवान – ४.२
५. वीण दोघांतली ही तुटेना – ४.०
तारिणी – ४.०
लग्नानंतर होईलच प्रेम – ४.०
६. लक्ष्मी निवास – ३.८
७. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ३.८
८. येड लागलं प्रेमाचं – ३.४
९. देवमाणूस – ३.१
१०. पारू – ३.०

दरम्यान, झी मराठी वाहिनीने गेल्या पाच वर्षात सर्वाधिक रेटिंग्स मिळवलं आहे. यावरील ‘देवमाणूस’ आणि ‘पारू’ या मालिका अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.