आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नेहमीच असते. एखाद्या पात्राच्या मनात दडलेली भावना कधी व्यक्त होणार, एखादं रहस्य कधी उलगडणार किंवा मिशन यशस्वी होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. ‘झी मराठी’च्या मालिकांमध्ये या आठवड्यात अशीच उत्सुकता कायम ठेवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना पाहायला मिळणार आहेत. ‘दीपज्योती’, ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या मालिकांमध्ये प्रेम, संघर्ष, धाडस आणि रहस्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे.
‘दीपज्योती’ मालिका
‘दीपज्योती’ मध्ये दीपच्या नव्या व्यवसायासमोर स्थानिक खंडणीखोरांचं आव्हान उभं राहणार आहे. या दबावामुळे परिस्थिती गंभीर होते. या प्रसंगात ज्योती दीपला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकते. दीपच्या आयुष्यात ज्योतीचं स्थान किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव या घटनांमधून अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दीप ज्योतीची रिक्षा परत मिळवून देतो. या घटनेमुळे दोघांमधील नात्याला आणखी एक भावनिक वळण मिळणार आहे. दुसरीकडे, दीपच्या मित्रांना त्याच्या मनातील बदल जाणवू लागला आहे. ज्योतीबद्दल दीपच्या मनात प्रेम निर्माण झालं आहे, हे त्याच्या मित्रांच्या लक्षात येतं.
मात्र, दीप स्वतःच्या भावनांचा स्वीकार करण्यास तयार नाही. गोकुळाष्टमीच्या दिवशी मात्र दीपच्या मनातील हे भाव बदलणार आहेत. दीपच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल पाहून त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली आहे, असा विश्वास आत्याला वाटू लागतो. ही मुलगी नेमकी कोण आहे आणि दीपच्या स्वभावातील बदलामागे ज्योतीच आहे, हे आत्याला समजणार का? याचा उलगडा येत्या आठवड्यात होईल.
‘तारिणी’ मालिका
‘तारिणी’ मध्ये प्रेक्षकांना मिशनचा थरार अनुभवायला मिळत आहे. मुलींना शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख करून घेण्यासाठी जोड्यांमध्ये संपूर्ण शहरात पाठवलं जातं. या संधीचा उपयोग तारिणी महत्त्वाची माहिती पुढे पोहोचवण्यासाठी करते. मिशनच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, तारिणी कुठे आहे याची चिंता केदारला सतावत आहे. तिच्याबद्दलची काळजी आणि तिच्या ठिकाणाची माहिती नसल्यामुळे तो अस्वस्थ आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईत जे.जे.ची नजर तारिणीवर पडते. तिने तारिणीला मुंबईत पाहिल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडणार आहे. जे.जे.ला खात्री पटते की, तारिणी अजूनही मुंबईतच आहे. तारिणीसमोर आता मिशन पूर्ण करण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे जे.जे.ला तिच्या मुंबईतील अस्तित्वाची खात्री झाल्यामुळे तिच्यावरचा धोका वाढणार आहे. अशा परिस्थितीत तारिणी आपलं मिशन कसं पूर्ण करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
‘देवमाणूस’ मालिका
‘देवमाणूस मधला अध्याय’ मालिकेमध्ये रहस्याचा थरार आणखी वाढणार आहे. डिंपल अजितचा फोन गुपचूप गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये ठेवते. त्यानंतर या फोनचं लोकेशन गोव्यात ट्रेस होतं. फोन गोव्यात सापडल्यामुळे जामकारच्या मनातील संशय आणखी गडद होतो. दुसरीकडे, तेजश्री आश्रमाबाबत महत्त्वाची माहिती जामकारला देते. मात्र ही माहिती पुरेशी नसल्याचं जामकारला वाटतं. त्यामुळे तो तेजश्रीला या प्रकरणाबाबत ठोस पुरावे गोळा करण्यास सांगतो. या आठवड्यात आश्रमात नेमकं काय घडत आहे, याचा शोध घेण्यासाठी तपासाला नवं वळण मिळणार आहे.
