‘शिवा'(Shiva) ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. या मालिकेतील शिवा, आशू, सिताई, रामभाऊ, दिव्या, चंदन, किर्ती, पाना गँग, बाई आजी, वंदना अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. शिवा तिच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखली जाते. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. ज्या शिवाचा सिताई तिरस्कार करत होती, त्याच सिताईने शिवाला तिच्या वेगळेपणासह तिची सून म्हणून स्विकारले. इतकेच नाही तर सिताईने शिवाची स्टाईलही आपलीशी करून घेतली. गाडी चालवण्यापासून ते शिट्टी वाजवण्यापर्यंत सर्व गोष्टी सिताई करताना दिसत आहे. शिवाचा बिंधास्तपणा सिताईनेदेखील आत्मसात केल्याचे पाहायला मिळते. सिताईची मुलगी व आशूची बहीण कीर्ती मात्र अजूनही शिवाविरूद्ध कारस्थान करत असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा ती शिवाविरूद्ध कारस्थान करताना समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
शिवाला मारण्याचा कीर्तीचा प्लॅन फसणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सिताई शिवा यांनी नववारी नेसली आहे. तसेच त्या रॅलीमध्येदेखील सहभागी झाल्या आहेत. सिताई म्हणते याला म्हणतात खरा मराठी सण आणि हा आहे खरा उत्सव. एकाठिकाणी गाडी थांबवत शिवा सिताईला विचारते की सिताई आपण नाचायला जाऊयात का? त्यावर सिताई उत्साहाने चला असे म्हणते. तिथे काही पारंपरिक खेळही पाहायला मिळत आहे. सिताई, शिवा आणि आशू एका ठिकाणी गाडी लावून गर्दीत सहभागी होतात.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की किर्ती व तिचा नवरा तिथे येतात आणि शिवाच्या गाडीचा ब्रेक सैल करतात. कीर्ती म्हणते की आता थोड्याच वेळात तिची काय अवस्था होईल ना हे तिला कळेल. त्यानंतर शिवा, आशू व सिताई परत त्यांच्या गाड्यांकडे येतात. सिताई शिवाला म्हणते, “किल्ली दे. मला तुझी गाडी चालवायची आहे.” शिवा सिताईला तुम्ही गाडी चालवा असे म्हणत किल्ली देते. सिताई शिवाची गाडी चालवत असून आशू तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तितक्यात सिताई गाडीचा ब्रेक लागत नसल्याचे सांगते. त्यानंतर शिवा जुगाड करत सिताईच्या गाडीवर बसते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सीताईच्या मागे खंबीर उभी सूनबाई शिवा”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केल्याचे कमेंट्समधून दिसत आहे. “शिवा असताना घाबरायचं कशाला”, “थोडं फिल्मी आहे, पण ठीक आहे. एकच नंबर शिवा”, “कडक एकदम.आज काल सुनबाई अशा दाखवायला पाहिजे. खरं वाटतं. तो कट कारस्थन, सासू-सूनेच्या ड्रामाचा चा कंटाळा आला. हे काहीतरी नवीन आहे”, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.



दरम्यान, कीर्तीने याआधीही शिवाला मारण्यासाठी कट केला होता. त्यावेळी सिताईने तिच्या कानाखाली दिली होती. आता कीर्ती व तिच्या नवऱ्याचे हे कारस्थान उघड होणार का आणि झाले तर सिताई त्यांना काय शिक्षा देणार तसेच मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.