Zee Marathi Shubh Shravani Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या एकापेक्षा एक दर्जेदार मालिका सुरू आहेत. विशेष म्हणजे या सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र, यापैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही सिरियल अवघ्या ७ महिन्यांत ऑफ एअर होतेय. मालिकेतील कलाकारांनीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लवकरच मालिका संपणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर यंदा जानेवारी महिन्यांत एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेचं नाव आहे ‘शुभ श्रावणी’. १९ जानेवारीला या सिरियलचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. वल्लरी विराजच्या कमबॅकमुळे या मालिकेची बरीच चर्चा झाली. याशिवाय लोकेश गुप्ते, आसावरी जोशी यांसारख्या कलाकारांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. आता लवकरच ही मालिका ऑफ एअर होईल.

सुरुवातीला ‘शुभ श्रावणी’ मालिका सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जायची. मात्र, नंतर या मालिकेची वेळ बदलून सायंकाळी ६:३० वाजताची करण्यात आली. शेवटी आता ही सिरियल अवघ्या सात महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेईल.

अभिनेत्री वल्लरी विराज श्रावणीच्या लूकमधील सेटवरचा फोटो शेअर करत लिहिते, “श्रावणी म्हणून शूटिंगचा शेवटचा दिवस…आपण मनाची कितीही तयारी केली तरीही Goodbye म्हणणं कायम कठीणच वाटतं”

‘शुभ श्रावणी’मध्ये रुद्रची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय म्हणाला, “रुद्र म्हणून वन लास्ट टाइम, मी या भूमिकेसाठी कायम ऋणी राहीन…या प्रवासादरम्यान अनेक गोष्टी शिकता आल्या.” मालिका संपणार असल्याने कलाकार सुद्धा काहीसे भावुक झाले आहेत.

‘शुभ श्रावणी’ मालिकेत प्रेक्षकांना वडील अन् मुलीच्या नात्याची एक अनोखी कथा पाहायला मिळाली. आत्याच्या हस्तक्षेपामुळे, तिने केलेल्या कारस्थानांमुळे वडील-मुलीचं नातं कसं बिघडतं…यानंतर श्रावणीच्या आयुष्यात कसे चढउतार येतात या संपूर्ण प्रवास ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून पाहायला मिळाला.

marathi serial off air
अभिनेत्री वल्लरी विराजची भावुक पोस्ट

दरम्यान, ‘शुभ श्रावणी’मध्ये वल्लरी विराज आणि सुमित विजय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यासह लोकेश गुप्ते, आसावरी जोशी, जुई तनपुरे, कोमल शेटे, तन्मय जक्का हे कलाकार मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले आहेत. आता या सिरिलयचा शेवटचा भाग केव्हा प्रसारित होणार…आणि ‘शुभ श्रावणी’ संपल्यावर सायंकाळी ६:३० वाजता कोणती मालिका ऑन एअर होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.