Zee Marathi Tarini Promo : तारिणीची आई वसुधा बेलसरेचा खरा गुन्हेगार खांडेकरांच्या घरातच आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. दयानंद खांडेकरांपासून डॉ. कामत, युवराज, पद्मिनी, कौशिकी, निशी या सगळ्यांवर संशयाची सुई आहे. आता यांच्यापैकी खरा मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा शोध तारिणी आणि केदार मिळून घेणार आहेत. मात्र, या सगळ्यात तारिणी तिचं मोठ्या सुनेचं कर्तव्य विसरलेली नाहीये. खांडेकरांच्या घरच्या प्रथा, परंपरा, नियम ती अगदी योग्यरित्या पाळतेय. पण, यादरम्यान तारिणीच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

खांडेकरांच्या घरावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी तारिणी आणि केदार पूजा करतात. याशिवाय तारिणीचा उपवास सुद्धा असतो. ती मंदिरात पूजेसाठी जात असताना चेहरा लपवून काही माणसं तिच्यावर बंदूक रोखून धरतात आणि तिला किडनॅप करतात.

हा प्रोमो पाहून चाहत्यांना सुरुवातीला वाटतं की, आता कोणतं नवीन संकट तारिणीवर आलंय पण, घडतं काहीतरी वेगळंच…तारिणीला पकडून एका अंधाऱ्या खोलीत आणलं जातं आणि तिच्या डोळ्यांवरचा रुमाल हटवला जातो. यावेळी तारिणीला समोर एक खास अन् जबाबदार व्यक्ती बसलेली दिसते.

तारिणीला पाहून ते म्हणतात, “फार कमी जणांच्या आयुष्यात देशासाठी शहीद होण्याची संधी येते…तू ऑपरेशन तिरंगासाठी तयार आहेस का?” हे ऐकताच तारिणी लगेच खुर्चीवरून उठते आणि म्हणते, “ऑर्डर द्या सर!” सरांच्या ऑर्डरप्रमाणे तारिणी तिचा शृंगार उतरवते आणि तिच्या नव्या मिशनप्रमाणे तयारी करते. पंजाबी ड्रेस, डोक्यावरून घेतलेली ओढणी अशा वेगळ्याच लूकमध्ये तारिणी दिसतेय. आता तारिणीचं हे नवीन मिशन काय असणार आणि यामध्ये ती यशस्वी होणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मात्र, या खास मिशनसाठी मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झालेली आहे. तारिणीला ‘ऑपरेशन तिरंगा’ मिशनची जबाबदारी सोपवणारे सर…हे दुसरे-तिसरे कोणीही नसून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आहेत. आता उदय टिकेकरांची भूमिका नेमकी काय आहे, त्यांचं आणि तारिणीचं कनेक्शन काय असेल? याबाबत सुद्धा प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वॉव आता खूपच मजा येणार”, “वॉव झी मराठी मानलं तुम्हाला मस्त”, “तारिणी मालिका यंदाचे सगळे अवॉर्ड्स डिझर्व्ह करते…इतकी सुंदर मालिका आहे”, “तारिणीच्या जीवाला धोका तर नाही ना?”, “प्रोमो पाहून अंगावर काटा आला”, “एपिसोडसाठी उत्सुकता आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत. दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपासून दररोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांना तारिणीचे हे विशेष भाग पाहायला मिळतील.