Zee Marathi Serial TRP : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र केदार अन् तारिणीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नासाठी सगळेजण उत्सुक आहेत पण, या शुभप्रसंगी एक मोठा कट रचला जातोय….तो म्हणजे कौशिकीला जीवे मारण्याचा. कपटी युवराजला… खांडेकरांची सगळी प्रॉपर्टी हवी असते. ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी युवराज मोठ्या बहिणीला जीवे मारण्याची सुपारी देतो. पण, कौशिकीला वाचवण्यासाठी तिच्या पाठिशी केदार आणि तारिणीची संपूर्ण टीम आहे. मालिकेचा हा जबरदस्त ट्रॅक प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरला आहे, आणि यामुळेच ‘तारिणी’ने गेल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला आहे.
BARC इंडियाने दिलेल्या टीआरपीच्या आकडेवारीनुसार ‘तारिणी’ मालिका ‘झी मराठी’वर नंबर वन ठरली आहे. ३.८ TVR मिळवत ‘तारिणी’ गेल्या आठवड्यात स्लॉट लीडर सुद्धा ठरली, म्हणजेच ९:३० वाजताच्या स्लॉटला ‘तारिणी’ला सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे.
तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, याला ३.५ TVR मिळाला आहे. याचबरोबर प्रेक्षकांची लाडकी स्वानंदी या आठवड्यात स्लॉट लीडर सुद्धा आहे. ‘झी मराठी’च्या एकूण चार मालिका या आठवड्यात स्लॉट लीडर ठरल्या होत्या.
- तारिणी ( ३.८ TVR )
- वीण दोघांतली ही तुटेना ( ३.५ TVR )
- देवमाणूस ( ३.३ TVR )
- तुला जपणार आहे ( २.६ TVR )
या चार मालिका या आठवड्यात स्लॉट लीडर ठरल्या असून, याव्यतिरिक्त ‘कमळी’ला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण, स्टार प्रवाहवर सध्या ‘ठरलं तर मग’ मालिका १ तास प्रसारित केली जातेय. त्यामुळे ‘कमळी’ गेल्या आठवड्यात स्लॉट लीडर होऊ शकली नाहीये.
‘तारिणी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘देवमाणूस’, ‘तुला जपणार आहे’ या चारही मालिकेच्या टीमने TVR आकडेवारी समोर येताच सर्वप्रथम प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, तारिणीबद्दल सांगायचं झालं तर, कौशिकीला वेळोवेळी कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय… याचा अंदाज आता युवराजला सुद्धा आलेला आहे. यामुळे युवराज स्वत: आपल्या बहिणीची सुपारी बापूरावांना देतो. आता कौशिकीला तारिणी कसं वाचवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. सध्या सुरू असलेल्या भन्नाट कथानकामुळे पुढच्या आठवड्यात सुद्धा या टीआरपीच्या शर्यतीत ‘तारिणी’ बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.
