Zee Marathi Serial Promo : ‘तारिणी’ मालिकेत नुकतीच कंपनीची जबाबदारी केदारच्या हाती सोपवण्यात आली आहे. कंपनीचा संपूर्ण कारभार केदारला दिल्यामुळे युवराज प्रचंड अस्वस्थ होतो. त्याला हा निर्णय अजिबात पटत नाही. युवराज दारूच्या नशेत केदारला मारण्याचाही प्रयत्न करतो पण, तारिणी वेळीच तिथे पोहोचते. आता युवराजच्या मनात फक्त बदला घेण्याची भावना निर्माण झाली आहे. यासाठी युवराज पुन्हा एकदा चुकीच्या मार्गावर जाणार आहे.

एवढे दिवस युवराज गुलाबच्या संपर्कात राहून ड्रग्ज, अमली पदार्थांच्या डील्स करत असतो. पण, आता पहिल्यांदाच तो गुलाबच्या बॉसला आणि या संपूर्ण प्लॅनच्या मुख्य मास्टरमाइंडला भेटणार आहे.

तारिणी आणि तिची टीम एवढे दिवस ज्या मास्टरमाइंडचा शोध घेत असते, त्याचा चेहरा अखेर उघड झालेला आहे. युवराज अखेर त्या मास्टरमाइंडला भेटतो आणि त्याच्यासमोर येणारा चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत पडद्यामागून सूत्रं हलवणारा मास्टरमाइंड पाहून युवराजला मोठा धक्का बसणार आहे. हा मास्टरमाइंड दुसरा-तिसरा कुणीही नसून डॉक्टर कामत असतो.

डॉक्टर कामत युवराजला रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावतो. आता या दोघांमध्ये काय चर्चा होणार, हे सगळं करण्यामागे डॉक्टर कामतचा मुख्य उद्देश काय आहे? याचा उलगडा ९ ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये होणार आहे.

मालिकेतील हा जबरदस्त ट्विस्ट पाहून प्रेक्षकही चक्रावले आहेत. “पहिल्या दिवसापासून कुठेतरी वाटत होतं…डॉक्टर कामत असणार”, “जबरदस्त मालिका सुरू आहे…बेस्ट ट्रॅक”, “डॉक्टरांना अजून कुणीतरी साथ देत असणार म्हणूनच त्यांचा चेहरा एवढ्या लवकर उघड केलाय”, “मास्टरमाइंड डॉक्टर कामत…आता या खेळात आणखी मजा येणार”, “तारिणी-केदार नक्कीच यालाही शोधून काढतील”, “युवराज घाबरणं स्वाभाविक आहे कारण त्याला यामागे डॉक्टर कामत असतील असं अपेक्षितच नाहीये”, “कामतचा खेळ खल्लास होणार” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

‘तारिणी’चा हा विशेष भाग ९ ऑक्टोबरला रात्री ९:३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाईल.