Tarini Upcoming Twist: एखादी व्यक्ती तिच्या कर्तव्याप्रति एकनिष्ठ असेल तर ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती कोणतेही टोक गाठू शकते. अशीच काहिशी तारिणी दिसते. ध्येयनिष्ठ, धाडसी, प्रेमळ, तितकीच खंबीर, तिच्या नजरेतून कोणताही गुन्हा आणि गुन्हेगार लपू शकत नाही, अशी तारिणी सतत लक्ष वेधून घेत.

झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेतील तारिणी आणि केदार यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघेही स्पेशल क्राइम युनिटचा भाग आहेत. तारिणी या युनिटची बॉस आहे. केदार वेळोवेळी तारिणीची मदत करतो, तिला साथ देतो. तारिणी जरी त्याला चांगला मित्र मानत असली तरी केदार मात्र तिच्या प्रेमात आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी एका मिशनसाठी केदार आणि तारिणीने सर्वांना त्यांनी लग्न केले आहे, असे खोटे सांगितले होते. मात्र, हे निशीला समजले. त्यानंतर त्या दोघांचे सत्य बाहेर आणण्यासाठी निशीने योजना आखली. तारिणी आणि केदारचे सर्वांसमोर लग्न लावावे, असे तिने घरच्यांना सुचवले.

जेणेकरून ते दोघे खरे लग्न करण्यास नकार देतील आणि त्यांच्या खोट्या लग्नाचे सत्य समोर येईल. सुरुवातीला त्या दोघांनी अनेक युक्त्या करत हे लग्न टाळण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी भांडणही केले. मात्र, याचदरम्यान केदारला निशीच्या प्लॅनबद्दल समजले. त्याने याबद्दल तारिणीला सांगितले, तसेच मिशन थांबवू असेही सुचवले.मात्र, तारिणीसाठी मिशन महत्वाचे असल्याने तिने खरेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. तारिणीला साथ देत केदारने तिला सर्वांसमोर प्रपोज केले.

आता तारिणीचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की तारिणीच्या हातात तिच्या व केदारच्या लग्नाची पत्रिका आहे. तारिणी म्हणते, “साता जन्माच्या या पवित्र नात्यात जरी परिस्थितीमुळे अडकलो असलो तरी मी या नात्यातून तुझी लवकरात लवकर सुटका करेन”, असे म्हणत भावुक झालेली तारिणी तिथून निघून जाते.

“आता सुटायचं नाहीये, आता अजून…”

त्यानंतर केदारला तारिणीबरोबरचे खास क्षण आठवतात. त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. तो मनात म्हणतो, “बॉस, आता सुटायचं नाहीये. आता अजून अडकायचं आहे. तुला माझ्या प्रेमात पाडायचं आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “या प्रेमळ नात्यातून सुटका कोणाला हवी आहे?”, अशी कॅप्शन दिली आहे.

तसेच, या प्रोमोवरही नेटकरी अनेक कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहेत. केदार स्वप्न सत्यात उतरु दे, ही उत्तम मालिका आहे, आता मजा येणार अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय घडणार, निशी कोणतं नवीन कारस्थान करणार, तारिणी केदारच्या प्रेमात पडणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.