Zee Marathi Serial TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारवर ठरवली जाते. दर आठवड्यात टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी प्रत्येक मालिकेची टीम प्रयत्न करत असते. गेल्या काही महिन्यांपासून रात्री नऊ वाजता कोणती मालिका सर्वाधिक टीआरपी आणणार यासाठी ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ आणि ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत जोरदार चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ‘कमळी’ने यात बाजी मारली असून ३.७ TVR सह अन्नपूर्णा आजीची नात ‘कमळी’ स्लॉट लीडर झाली आहे.
‘BARC इंडिया’कडून नुकताच गेल्या आठवड्याचा टीआरपी जाहीर करण्यात आला आहे. टीआरपीसमोर येताच ‘झी मराठी’ने स्लॉट लीडर ठरलेल्या सगळ्या मालिकांचं आणि त्यामधील कलाकारांचं खास पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे.
टीआरपीच्या शर्यतीत ‘झी मराठी’च्या एकूण पाच मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. ‘कमळी’ आणि तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकांना सारखाच टीआरपी मिळाला आहे. तेजश्रीची मालिका सुद्धा ३.७ TVR सह साडेसात वाजताची स्लॉट लीडर ठरली आहे.
‘कमळी’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या पाठोपाठ रात्री साडेनऊच्या स्लॉटला ‘तारिणी’ने बाजी मारली आहे. केदारचा अपघात, त्यानंतर केदारचं घरी परतणं, तारिणी-केदारचं लग्न व्हावं ही आजीची इच्छा हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रात्री दहा वाजता प्रसारित होणारी ‘देवमाणूस’ आणि साडेदहाच्या स्लॉटची ‘तुला जपणार आहे’ या दोन्ही मालिका देखील स्लॉट लीडर ठरल्या आहेत.
‘झी मराठी’च्या पाच मालिका ठरल्या स्लॉट लीडर
- वीण दोघांतली ही तुटेना – ३.७ ( सायंकाळी ७:३० वाजता )
- कमळी – ३.७ ( रात्री नऊ वाजता )
- तारिणी – ३.६ ( रात्री ९:३० वाजता )
- देवमाणूस – ३.२ ( रात्री १० वाजता )
- तुला जपणार आहे – २.७ ( रात्री १०:३० वाजता )
प्रेक्षकांचे आभार मानले…
दरम्यान, ‘झी मराठी’ने या पोस्ट शेअर केल्यावर चाहत्यांनी यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “कडक फेब्रुवारीची बेधडक सुरुवात…” असं कॅप्शन या पोस्टना देत वाहिनीने सर्व प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस या मालिकांमध्ये नवनवीन खुलासे होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘कमळी’ आता महाजनांच्या घरात अन्नपूर्णा आजीची नात म्हणून एन्ट्री घेणार आहे. आता ‘कमळी’च्या एन्ट्रीनंतर मालिकेच्या टीआरपीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

