Tula Japnar Aahe Fame Marathi Actress : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मालिकांमध्ये विविध ट्विस्ट अँड टर्न्स आणले जातात. चित्रपटांसारखे अॅक्शन सीक्वेन्स आता प्रेक्षकांना दैनंदिन मालिकांमध्येही पाहायला मिळतात. कलाकार सुद्धा यासाठी प्रचंड मेहनत घेतात. जवळपास सगळ्याच मालिकांचं शूटिंग १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. तरीही, कलाकार मनापासून काम करतात. ‘झी मराठी’ वाहिनीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अशीच एक थ्रिलर मालिका ऑन एअर झाली. या मालिकेचं नाव आहे ‘तुला जपणार आहे’. गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. विशेषत: रात्री उशिरा प्रसारित होऊनही मालिकेला दमदार टीआरपी आहे. यामध्ये अभिनेत्री महिमा म्हात्रे प्रमुख भूमिका साकारत आहे.
महिमा या मालिकेत मीराची भूमिका साकारतेय. गेल्या काही महिन्यांपासून नाकावर अन् कपाळावर पट्टी लावून ती शूटिंग करतेय. अनेकदा मालिकेतील सीन्समध्येही अभिनेत्री बँडेज पट्टी लावून शूटिंग करत असल्याचं पाहायला मिळतं. याशिवाय महिमाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्येही हे बँडेज पट्टी दिसतेय. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच साधारण ८ महिन्यांपूर्वी महिमाने अॅक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सुरू असताना दुखापत झाल्याचं सांगितलं होतं.
“काळजी करू नका थँक्यू…तुम्हा सर्वांचं असंच प्रेम काय राहूदेत. थोडं लागलं आहे डॉक्टर म्हणाले की लवकरच पट्टी काढणार” असं महिमाने सर्वांना सांगितलं होतं. पण, आता जवळपास ८ महिने उलटून गेले तरीही महिमाच्या नाकावरची पट्टी अगदी जशीच्या तशी दिसतेय. त्यामुळे तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत.
महिमाने नुकतेच निळ्या रंगाच्या सुंदर साडीतले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्येही तिच्या चेहऱ्यावरील बँडेज पट्ट्या दिसत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा या फोटोवर कमेंट्स करत तिच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.
“ही पट्टी कधी काढणार…बाकी तुझा अभिनय खरंच कमाल आहे”, “नाकाची पट्टी कधी काढणार…आता खूपच दिवस झालेत”, “साडीमध्ये गोड दिसतेस मीरा पण नाकावरच्या पट्टीचं काय झालं?”, “मीरा ताई खूप महिने झाले नाकावरील पट्टी कधी काढणार?” अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यामध्ये महिमा म्हात्रेसह प्रतीक्षा शिवणकर, नीरज गोस्वामी, शर्वरी लोहकरे, मिलिंद फाटक, तनिष्का विशे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
