Mugdha Godbole entry in Tula Japnar Aahe: ‘तुला जपणार आहे’ ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील पात्रे, त्यांच्या आयुष्यात येणार चढ-उतार, अंबिका- मीरा या बहि‍णींमधील प्रेम, चिरतरुण राहण्यासाठी मंजिरी करत असलेले कारस्थान या सगळ्यामुळे मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळते.

तुला जपणार आहे या मालिकेत मंजिरीला चिरतरुण व्हायचे आहे. त्यासाठी ती इतरांचे बळी देत आहे. तिने दादासाहेब रामपुरेंच्या पहिल्या पत्नीला मारले आणि दादासाहेबांबरोबर लग्न केले. इतकेच नाही, तर मीरा व अंबिकाच्या आईलादेखील तिने मारले. अंबिकाला पळवून आणून रामपुरेंच्या आश्रमात वाढवले.

अंबिकाचे दादासाहेबांच्या मुलाशी म्हणजेच अथर्वशी लग्न लावून दिले. त्यानंतर तिने मायाच्या मदतीने अंबिकालादेखील मारले. मात्र, अंबिकाचा आत्मा रामपुरेंच्या घरात वावरतो. अंबिका फक्त मीरा व मंजिरीला दिसते. मंजिरीने वेदालादेखील अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबिकाच्या बहिणीचे म्हणजेच मीराचे अथर्वशी लग्न झाले आणि मीराने आई होऊन वेदाची काळजी घेतली.

मुग्धा गोडबोले यांची ‘तुला जपणार आहे’ मालिकेत एन्ट्री

मीराला तिच्या वडिलांमुळे मंजिरीचे सत्य माहीत आहे. जेव्हा तिने ते सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. उलट, अथर्व व तिच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले. अंबिकाचादेखील सुरुवातीला बहिणीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. काही काळाने मंजिरीचे सत्य तिच्यासमोर आले. काही दिवसांपूर्वी जेव्हा दादासाहेबांना मंजिरीचे सत्य समजले. तेव्हा मंजिरीमुळे त्यांना जीव गमवावा लागला. दादासाहेब ही भूमिका अभिनेते मिलिंद पाठक यांनी साकारली होती.

आता या सगळ्यात एका अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने तुला जपणार आहे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की माया, तिची सासू, नवरा व सासरा एकत्र आहेत. त्यांच्यासमोर एक बोर्ड आहे. त्यावर एक वाटी फिरवत ते म्हणतात की, दादासाहेबांचा आत्मा प्रकट होतो. त्यांनी केलेल्या गोष्टीमुळे एक आत्मा प्रकट होतो. तो आत्मा दादासाहेबांचा नसतो; तर एका बाईचा असतो. त्या आत्म्याला पाहून सगळे घाबरतात. माया जोरात किंचाळते. तिला ,कोण आहेस तू? असे विचारते. तितक्यात मीरा तिथे येते आणि ती आई म्हणते. म्हणजेच आता रामुपरेंच्या घरात मीराच्या आईच्या आत्मा आला आहे.

मीराच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे दिसत आहेत. मुग्धा गोडबोले रानडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत लिहिले की, झी मराठीवर तुला जपणार आहे या मालिकेसाठी लवकरच भेटूया.

दरम्यान, आता मीराच्या आईच्या येण्याने काय समीकरणे बदलणार? मीरा, अंबिका त्यांच्या आईबरोबर मिळून मंजिरीला धडा शिकवणार का? मंजिरीचे सत्य घरातील इतर सदस्यांना कधी समजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.