‘झी मराठी’ वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका १३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास २ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अक्षरा व अधिपती यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता हृषिकेश शेलार प्रमुख भूमिका साकारत आहेत. नुकतीच या दोघांनी ‘झी मराठी’ वाहिनीने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात उपस्थित लावली होती. यावेळी ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना शिवानी व हृषिकेश यांनी मालिका लवकरच संपणार आहे असं सांगितलं. याशिवाय, यापुढेही ‘झी मराठी’बरोबर नवीन प्रोजेक्टमध्ये काम करायला नक्कीच आवडेल असंही या दोघांनी स्पष्ट केलं.
अक्षरा ( शिवानी रांगोळे ) म्हणाली, “आज जवळपास दोन वर्षे तीन महिने आमची मालिका सुरू आहे. या काळात सगळ्या प्रेक्षकांचं आम्हाला खूप प्रेम मिळालं. हृषिकेशचे नाटकाचे प्रयोग असतात तेव्हा तिथेही लोक त्याला मालिकेबद्दल येऊन सांगत असतात. आमची टीम खरंच खूप चांगली होती. कोणीच कधीही या मालिकेत काम करायचंय म्हणून केलं नाही…सगळेजण आपुलकीने काम करत होते. त्यामुळे अशा सुंदर टीमपासून दुरावणार याचंही वाईट वाटतंय.”
अधिपती ( हृषिकेश शेलार ) म्हणाला, “मला नाटकाच्या प्रयोगाला १० लोक भेटले तर, त्यातले ९ लोक तरी सांगतात की आम्ही तुमची मालिका पाहतो, खूप छान मालिका असते वगैरे…त्यामुळे आता मालिका संपताना निश्चितच वाईट वाटणार आहे. एखादा प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतो तेव्हाच आपल्याला माहिती असतं की, कधी ना कधी हा प्रोजेक्ट संपणार आहे. त्यामुळे शूटिंगच्या शेवटच्या दिवशी खरंच वाईट वाटेल.”
“झी मराठीबरोबर पुन्हा एकदा काम करायला नक्की मजा येईल. आम्ही दोघांनी गेल्याच्या गेल्यावर्षी पहिल्यांदाच ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याचं एकत्र अँकरिंग सुद्धा केलं होतं. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी होती. त्यावेळी माधुरी दीक्षित सुद्धा आल्या होत्या. एवढी मोठी जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली ही आम्हा दोघांसाठी खूप मोठी गोष्ट होती.” असं मत अक्षरा व अधिपती यांनी व्यक्त केलं आहे.