सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने ‘मी कात टाकली’ या मालिकेची घोषणा केली. या मालिकेच्या घोषणेनंतर ‘झी मराठी’ने साधारण वर्षभरापूर्वी घोषणा केलेल्या ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा मुहूर्त पार पाडला आहे. कारण, या दोन्ही मालिकांच्या टीझरवरून या कथानकात ‘नागीण’ फॅक्टर कॉमन असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत कोणत्या वाहिनीची मालिका यशस्वी ठरेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल.

‘झी मराठी’ने सर्वात आधी नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘इच्छाधारी नागीण’ या प्रोजेक्टची घोषणा केली. यानंतर मार्च २०२५ मध्ये या मालिकेचा एक वेगळा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. मध्यंतरीच्या काळात अनेक मालिका ऑन एअर झाल्या. त्यामुळे ‘इच्छाधारी नागीण’ ही मालिका सुरू होणार की नाही अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर गेल्याच आठवड्यात ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा शुभारंभ होऊन सेटवर मुहूर्त पूजा पार पडल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते.

आता जी गोष्ट जाणून घेण्याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, त्याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. झी मराठीच्या ‘इच्छाधारी नागीण’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री गौरी शेळगांवकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. गौरीने यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘प्रथाओं की ओढ़े चुनरी: बींदणी’, ‘सफल होगी तेरी आराधना’ अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. आता ही साधीभोळी गौरी ‘इच्छाधारी नागीण’ होऊन आपल्या भेटीला लवकरच येणार आहे.

“नागलोकाची अद्भूत राणी, रूपाने मोहिनी…लवकरच अवतरणार भूतलावर पूर्ण करण्या तिच्या सूडाची प्रेम कहाणी! इच्छाधारी नागीण- सूडाची प्रेमगाथा” असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर संमिश्र प्रतिसाद दिला आहे. अनेकांना गौरी नागीणच्या भूमिकेत योग्य वाटतेय. तर, काही नेटकऱ्यांनी नागीणच्या भूमिकेसाठी, ही अभिनेत्री फारशी सूट होत नाहीये असंही म्हटलं आहे.

‘इच्छाधारी नागीण’ या मालिकेची पहिली झलक आजच ( १५ जून २०२५ ) प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली. आता ही नवीन थ्रिलर मालिका केव्हा ऑन एअर होणार, याऐवजी कोणती मालिका संपणार हे लवकरच स्पष्ट केलं जाईल.