Yetech Aata Me Nandayla : झी मराठीने पुरस्कार सोहळ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या नव्या अन् बहुप्रतीक्षित मालिकेची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहिनीवर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या कमबॅकच्या चर्चा होत्या. त्या नव्या मालिकेत ठकुबाईची भूमिका साकारणार आहेत. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘येतेच आता मी नांदायला!’ यामध्ये उषा नाडकर्णींच्या जोडीला कोणकोणते कलाकार झळकणार आणि यामधील लीड जोडी नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…

आदेश बांदेकरांची लाडकी सून म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिचं नाव आहे शिवानी! “ठकुबाईची असेल दुनिया दिवानी, तिला पुरून उरते फक्त कदमांची शिवानी!” अशी तिची ओळख आहे.

तर, पूजासह या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे हर्षद अतकरी. हा अभ्या ठकुबाईचा नातू आहे. तो ५० वेळा नापास झालाय तरीही गावात त्याची मिरवणूक निघालीये. तर, दुसरीकडे शिवानी अभ्यासात हुशार आणि शिस्तीने जगणारी असते. खूप अभ्यास करून, जबाबदारी स्वीकारून तिला आपलं करिअर घडवायचं असतं.

पण, या दोघांमध्ये आहेत ठकुबाई! आपल्या नातवासाठी मी हवी तशी सून शोधेन…हा ठकुबाईचा निश्चय आहे. त्यामुळे आता शिवानी-अभ्या यांची लव्हस्टोरी कशी पुढे जाणार याचा उलगडा मालिकेतून होईल. ‘येतेच आता मी नांदायला!’ ही नवीन मालिका येत्या ३० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल.

सध्या झी मराठीवर दहा वाजताच्या स्लॉटला किरण गायकवाडची थ्रिलर ‘देवमाणूस’ मालिका सुरू आहे. कथानक पाहता २७ नोव्हेंबरला या मालिकेचा शेवट होण्याची दाट शक्यता आहे. अद्याप झी मराठीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.

दरम्यान, पूजा आणि हर्षदवर या नव्या मालिकेसाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.