Savalyachi Janu Savali Upcoming Twist: गरीब कुटुंबातील पण स्वाभिमानी सावली प्रेक्षकांची लाडकी आहे. श्रीमंत कुटुंबातील पण प्रेमळ असा सारंगही प्रेक्षकांची मने जिंकू घेतो. नुकतीच त्यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचे पाहायला मिळाले.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावली ही गरीब कुटुंबातील असण्याबरोबरच सावळ्या रंगाचीदेखील आहे. जगन्नाथने तिचे लग्न मेहेंदळे कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाबरोबर म्हणजेच सारंगबरोबर लावले. विशेष बाब म्हणजे सारंगच्या आईला तिलोत्तमाला वस्तूंपासून ते माणसांपर्यंत सर्वच गोऱ्या रंगाचे हवे असते, त्यामुळे सावलीवर तिचा राग असल्याचे पाहायला मिळाले.

लग्नानंतर सावलीला ऐश्वर्या व तिलोत्तमाने त्रास दिला. मात्र, सावलीने तिच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकली. तिची व सारंगची घट्ट मैत्री झाली. नुकतेच सावलीने अस्मी सर्वांना फसवत असल्याचे सत्य सर्वांसमोर आणले. त्यानंतर सारंगने सावलीवर त्याचे प्रेम असल्याचे सांगितले आणि त्यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.

काही दिवसांपूर्वी सावलीच्या मदतीने सोहम व ताराने लग्न केले होते. तारा ही भैरवी वझेची मुलगी आहे. ताराला लोकप्रिय गायिका म्हणून ओळखले जाते. मात्र, तारा जे गाणे म्हणते ते खरे तर सावली गाते. सर्वांसाठी सावली ताराची असिस्टंट आहे. खरेतर, सावली गाणे गाते आणि तारा गाणे म्हणण्याचे नाटक करते. या बदल्यात ताराची आई भैरवी सावलीच्या भावाच्या दवाखान्याच्या खर्चाचे पैसे देते. या सगळ्यात भैरवी व तारा अनेकदा सावलीला वाईट वागणूक देतात. मात्र, सोहमबरोबर लग्न करून देण्यात सावलीने मदत केल्यानंतर तारा तिच्याशी चांगले वागत असल्याचे पाहायला मिळत होते.

आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. तारा सावलीबरोबर वाईट वागणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली किचनमध्ये काम करत आहे. तिथे तारा येते. सावली ताराला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का? त्यावर तारा तिला सांगते की कॉफी हवी होती. त्यानंतर तारा तिथल्याच एका खुर्चीवर बसते. काम करत असलेली सावली ताराला म्हणते, “तारा मॅडम मला कप द्या ना.”

ताराला सावलीच्या कप मागण्याने राग येतो. ती सावलीकडे जाते आणि ती तिला म्हणते, “तू मला कप द्यायला सांगतेस? तू माझी असिस्टंट आहेस, माझी मोठी जावू बनू नकोस. माझा चेहरा तुझ्या आवाजाची ओळख आहे, लायकीत राहायचं. मी तुझ्यासारखी गरीब घरातील साधारण मुलगी नाही. माझी स्वत:ची ओळख आहे, कारण मी तारा वझे आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लग्न होऊन घरी येताच बदलणार ताराचा सूर”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

“झालं शेवटी लायकी दाखवली”, “सावलीने आता गप्प राहायचं नाही, ताराची जागा दाखवून द्यायची”, “आता सावलीने स्वाभिमान जपला पाहिजे. ऐश्वर्या, तिलोत्तमा, तारा, भैरवीला धडा शिकव”, “खूप हौस होती ताराला जाऊबाई करून घेण्याची, शेवटी तिने तिची लायकी दाखवलीच”, “सर्वांना माहीत होतं, हे असंच होणार.”

“घोड्यावर बसून अस्मीला धडा शिकवणाऱ्या सावलीला पुन्हा शेळी दाखवू नका. तिचा काहीतरी स्वाभिमान असू द्या. कोणीही यावं आणि थोबाडीत मारून जावं हे मालिकेच्या मुख्य नायिकेला शोभत नाही याची दखल घ्या”, “कृपया, मुळमुळीत सावली दाखवू नका”, “सावलीने आता तारालासुद्धा तिची लायकी दाखवून दिली पाहिजे”, अशा अनेक कमेंट करीत सावलीने आता शांत राहून सहन केले नाही पाहिजे, अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ताराच्या या वागण्यावर सावलीची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.