‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत बहीण-भावाच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळते. सूर्या त्याच्या चार बहिणींना आई-वडिलांचे प्रेम देतो. त्यांना मायेने सांभाळतो. सूर्यादादा व त्याच्या बहिणींचे बॉण्डिंग अफलातून आहे. या भावंडांमध्ये अतोनात प्रेम दिसते. सूर्यादादा त्याच्या बहिणींवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करीत असतो. जर त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल किंवा त्यांना कोणी त्रास देत असेल, तर सूर्या त्या व्यक्तींना सरळही करतो.
राजश्री, तेजश्री, धनू, भाग्या या त्याच्या बहिणी त्यांच्यामुळे सूर्याला कोणत्या गोष्टीचे वाईट वाटू नये म्हणून काळजी घेत असतात. कधी सूर्या चुकलाच, तर त्या त्याला त्याची चूक समजावूनही सांगतात. त्यामुळे संकटात कायम एकमेकांबरोबर असणाऱ्या, सुख-दु:खात साथ देणाऱ्या या भावंडांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेतून जितकी भावंडे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तशीच ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.
सूर्या दादाचा बहिणींबरोबर ‘या’ ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स
लाखात एक आमचा दादा या मालिकेतील या कलाकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका ट्रेडिंग गाण्यावर त्यांनी व्हिडीओ शूट केला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘डोसा इडली…’ हे गाणे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्यावर त्यांनी अॅक्शन केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर ‘जगताप कुटुंब प्रत्येक रविवारी’ असे लिहिले आहे. हा व्हिडीओ शूट करताना ते हसतही असल्याचे दिसत आहे. या मालिकेत सूर्याची भूमिका साकारणाऱ्या नितीश चव्हाणने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच भाग्याची भूमिका साकारणारी जुई तनपुरे, धनश्रीच्या भूमिकेत दिसणारी समृद्धी साळवी, राजश्रीच्या भूमिकेतील ईशा संजय, तेजूच्या भूमिका वठवणारी कोमल मोरे या अभिनेत्रींना नितीशने टॅग केले आहे. तसेच, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या इन्स्टाग्राम अकाउंटलादेखील त्याने टॅग केले आहे.
नितीश चव्हाण ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील इतर कलाकारांबरोबर अनेकदा डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. मालिकेत त्याच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या महेश जाधव व स्वप्नील कणसे या अभिनेत्यांबरोबर नितीश डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या व्हिडीओंना प्रेक्षकांची पसंतीही मिळते. महेश जाधव व स्वप्नील कणसे यांनी मालिकेत काजू व पुड्या ही पात्रे साकारली आहेत.
दरम्यान, मालिकेत दाखविल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच सूर्याला शत्रूचे खरे रूप समजले. शत्रू तेजूला मारत असताना सूर्याने पाहिले. त्यानंतर तो तिला घरी घेऊन आला. त्यानंतर धनूच्या लग्नाची गडबड पाहायला मिळाली. पण, ज्याच्याबरोबर धनूचे लग्न ठरले आहे, ते तो पैशासाठी करीत असल्याचे सूर्याच्या समोर येते. पैशाची मागणी केल्यानंतर सूर्या हे लग्न मोडणार आहे अणि धनूदेखील त्याला साथ देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे डॅडींचा सूर्याला अपमानित करण्याचा प्लॅन यशस्वी होणार का की तो त्यांच्यावरच उलटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.