Thalapathy Vijay and Trisha Krishnan at a wedding reception in Chennai : तमिळ सुपरस्टार व राजकारणी थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोट मागितला आहे. यावर अद्याप विजयने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचे एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा त्याच्या पत्नीने आरोप केला आहे. याचदरम्यान विजयने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर गुरुवारी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

विजय त्रिशाबरोबर उद्योगपती आणि चित्रपट निर्माते कल्पाथी एस. सुरेश आणि मीनाक्षी सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला. त्यामुळे ज्या अभिनेत्रीबरोबर विजयचं नाव जोडलं जातंय, ती त्रिशा आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

विजय आणि त्रिशा या ठिकाणी एकत्र आले होते. त्यांनी नवविवाहित जोडप्याबरोबर फोटो काढले आणि त्यानंतर ते तिथून एकत्रच बाहेर पडताना दिसले. विजयने सोनेरी रंगाचा रेशमी शर्ट आणि पारंपारिक ‘वेष्टी’ परिधान केली होती. त्रिशाने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची रेशमी साडी नेसली होती. त्याला लाल रंगाचे काठ होते. त्यावर तिने स्लिव्हलेस लाल ब्लाऊज आणि गळ्यात सुंदर हार घातला होता.

पाहा विजय-त्रिशाचा व्हिडीओ

संगीता विजयने घटस्फोटाचा अर्ज केला दाखल

विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच चर्चा होत असताना तो त्रिशाबरोबर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला. काही दिवसांपूर्वीच विजयची पत्नी संगीता हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिने असा आरोप केला आहे की, विजयचे दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. या संबंधांमुळे आपल्याला प्रचंड मानसिक व भावनिक त्रास झाला आहे. त्याने नात्यात विश्वासघात केला, असंही संगीताने म्हटलंय.

सुरुवातीला विजयने हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते, पण तरीही ते सुरूच राहिले. सोशल मीडियावरील चर्चांमुळे झालेली बदनामी, भावनिक दुर्लक्ष आणि मानसिक छळ यामुळे आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं तिने अर्जात म्हटलं आहे. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ आणि पुन्हा ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात वकिलांच्या मदतीने आणि आपापसांत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला यश आलं नाही.

संगीताच्या मते, हे लग्न आता पूर्णपणे मोडले असून ते फक्त कागदोपत्री उरले आहे. त्यामुळे तिने न्यायालयाकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. विजयचे उत्पन्न आणि सामाजिक दर्जा लक्षात घेऊन कायमस्वरूपी पोटगी मिळावी, अशी मागणी तिने केली आहे. तसेच, जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत नीलंकरई येथील सासरच्या घरी राहण्याचा अधिकार किंवा त्याच दर्जाची दुसरी राहण्याची व्यवस्था विजयने करून द्यावी, अशी विनंती तिने केली आहे.

दरम्यान, विजय व त्रिशा यांनी आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात घिल्ली, तिरुपाची, आथी, कुरुवी व लिओ यांचा समावेश आहे.