Thalapathy Vijay on Divorce and Affair Rumors : तमिळ अभिनेता व राजकारणी थलपती विजय सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमने चेंगलपट्टू येथील जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विजयचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. आता पहिल्यांदाच विजयने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ममल्लापुरम इथे तिच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या त्याच्या राजकीय पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजयने महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. समर्थकांनी भरलेल्या सभागृहात विजयने २४ मिनिटांचं भाषण केले. त्याने महिलांना दरमहा २,५०० रुपये, वर्षाला सहा गॅस सिलिंडर, लग्नासाठी आठ ग्रॅम सोनं, तामिळनाडू राज्यात मोफत बस प्रवास, तसेच नवजात बालकांसाठी सोन्याची अंगठी देण्याचं आश्वासन दिलं.
थलपती विजय काय म्हणाला?
विजय म्हणाला, “अलीकडे अनेक वाद सुरू आहेत. मला दिसतंय की तुमच्यापैकी अनेक जण मला पाठिंबा देत आहेत आणि या चर्चांमुळे तुम्हाला त्रास होतोय. तुम्हाला त्रास होताना पाहून मलाही दुःख होतंय. मी हे सगळं सांभाळून घेईन. आपण फक्त लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करूया. ते वाद आता महत्त्वाचे नाहीत, त्यामुळे कृपया त्या गोष्टींमुळे त्रास करून घेऊ नका.”
विजयने थेट कोणत्याही वादाचा उल्लेख केलेला नाही. पण त्याचं हे वक्तव्य त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणि विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांच्या संदर्भात असल्याचं दिसून येतंय. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय.
विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला दाखल
४८ वर्षीय संगीताने याचिकेत नमूद केलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाची सुरुवातीची काही वर्षे खूप आनंदात गेली. तिने घर सांभाळलं व मुलांचं संगोपन केलं. पण एप्रिल २०२१ मध्ये पती विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं. यामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला असून, हा विश्वासघात आहे. तिने याबद्दल विचारल्यावर विवाहबाह्य संबंध संपवणार, असे आश्वासन विजयने दिले होते. पण तसं झालं नाही. यामुळे मानसिक त्रास झाला, सोशल मीडिया पोस्टमुळे सार्वजनिक अपमान सहन करावा लागला, तसेच विजयने दुर्लक्ष केलं. त्याचबरोबर सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ आणि पुन्हा ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वकील आणि आपापसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
आपलं लग्न आता फक्त कागदोपत्रीच उरलंय, असं म्हणत संगीता विजयने काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, कायदेशीररित्या घटस्फोट मंजूर करण्यात यावा, विजयचे उत्पन्न आणि सामाजिक दर्जा यानुसार योग्य ती पोटगी मिळावी, तसेच या याचिकेवर निर्णय येईपर्यंत तिला नीलांकरई येथील त्याच्या घरात राहण्याचा अधिकार मिळावा आणि दोघांची प्रतिमा व प्रायव्हसी जपण्यासाठी प्रकरणावरील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ व्हावी, असं संगीता विजयने याचिकेत नमूद केलंय.
विजय व त्रिशाने एकत्र रिसेप्शनला हजेरी लावली
पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर विजय त्रिशाबरोबर चेन्नईत एका रिसेप्शन सोहळ्याला पोहोचला. दोघेही ट्विनिंग करून पोहोचल्याने त्यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आलंय. संगीताने ज्या अभिनेत्रीचा उल्लेख केला ती त्रिशा कृष्णन असल्याचे अंदाज चाहत्यांनी व्यक्त केले आहेत.
