Thalapathy Vijay : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय उर्फ ‘थलापती’ने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटांमधील यशाबरोबरच त्याने आता राजकारणातही पाऊल टाकत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विजयने त्याच्या करिअरची सुरुवात ‘नालय्या थीरपू’ (Naalaiya Theerpu) या चित्रपटातून केली, पण हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र त्यानंतर ‘घिल्ली’ (Ghilli), ‘थुप्पाकी’ (Thuppakki) आणि ‘मर्सल’ (Mersal) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि मोठा चाहतावर्ग तयार झाला. 

गेल्या काही वर्षांत विजयने काम केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये सामाजिक आणि राजकीय संदेशही दिसून येतो, त्यामुळे त्याची ऑनस्क्रीन भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील विचार यात साधर्म्य दिसतं. २०२४ मध्ये त्याने अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला.  

‘या’ चित्रपटामुळे विजय झाला सुपरस्टार

‘जागरण’च्या वृत्तानुसार २००४ मध्ये घिली (Ghilli) हा तमिळ चित्रपट घरगुती बॉक्स ऑफिसवर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर विजयला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर ‘थुपक्की’, ‘मर्सल’ (Thuppakki, Mersal), ‘मास्टर’ आणि ‘लिओ’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे त्याने दोन दशकं इंडस्ट्रीवर राज्य केलं. विजयने सुमारे ६८ चित्रपटांमध्ये काम केलं असून तमिळनाडूमध्ये सर्व वयोगटांमध्ये त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 

विजयच्या अनेक चित्रपटांमध्ये राजकीय संदेश हा मुख्य विषय बनला आहे. २०१३ मधील ‘थलायवा’ (Thalaivaa) हा चित्रपट ‘टाईम टू लिड’ या टॅगलाइनसह प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याने ‘सरकार’, ‘कथथी’ Kaththi आणि ‘मास्टर’ असे चित्रपट आले, ज्यामध्ये प्रत्येक वेळी अधिक ठळक राजकीय संदेश पाहायला मिळाला. इतकंच नाही तर त्याच्या शेवटच्या ‘जना नायगन’ या चित्रपटाच्या नावाचाही अर्थ ‘जनतेचा नेता’ असा होतो.

निवडणुकीत विजयला मिळेल का यश ?

फेब्रुवारी २०२४ मध्ये विजयने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आणि ‘तमिळगा वेत्री कळगम’ हा स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी तब्बल ८५.१% इतकं विक्रमी मतदान झालं. आज त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. हे निकाल विजयचा राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. तसंच, तमिळनाडूतील जनता पारंपरिक द्रविड पक्षांऐवजी नव्या नेतृत्वाला संधी देण्यास तयार आहे का? हेही यातून स्पष्ट होणार आहे.