Thalapathy Vijay Sangeetha Divorce : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि राजकीय आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता सध्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहे. ४ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीतील निकालात त्याच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि सर्वाधिक जागा जिंकत सत्ता मिळवली. परंतु, राजकीय वर्तुळात विजय अनेकांच्या चर्चेचा विषय असताना दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
विजय व दाक्षिणात्य अभिनेत्री त्रीशा कृष्णन यांच्या नात्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना ती निकालाच्या दिवशी अभिनेत्याच्या घरी गेल्याने तिचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा या चर्चांना तोंड फुटलं. काही दिवसांपूर्वीच विजयच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि विजयचे लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला. माध्यमांच्या वृत्तानुसार यावेळी तिने तिचा नवरा विजयवर कोर्टात काही आरोप केले होते.
विजय-संगीताचा २७ वर्षांचा संसार घटस्फोटाच्या वाटेवर
‘नवभारत टाईम्स’च्या वृत्तानुसार थलपती विजयची पत्नी संगीता सध्या त्याच्यापासून वेगळ्या राहत आहेत. संसारात आणि मुलांच्या संगोपनात व्यग्र असलेल्या संगीतासाठी विजय सर्वस्व होता. मात्र, तब्बल २७ वर्षांचा हा संसार आता घटस्फोटाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. एकेकाळी विजयचं प्रेम असलेल्या संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल करताना सासरच्या घरात राहण्याचा अधिकार मागितला आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना स्वतःला घराबाहेर राहावं लागू नये, यासाठी त्यांनी न्यायालयात तात्पुरता दिलासा (interim relief) मागितला आहे.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार संगीता यांनी विजयवर केलेल्या पाच आरोपांमध्ये त्याचे विवाहबाह्य संबंध असलेली अभिनेत्री वारंवार त्याच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावतात आणि कथित अभिनेत्रीबरोबरचे संबंध संपवणार असं आश्वासन देऊनही विजयने ते केलं नाही अशा काही आरोपांचा यामध्ये समावेश आहे.
पत्नीने विजयवर केले ‘हे’ पाच आरोप
संगीता यांनी केलेल्या आरोपांमधील पहिला आरोप हा आहे की, ५१ वर्षीय विजयचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध होते. याचिकेनुसार, २०२१ मध्ये संगीता यांना विजय एका अभिनेत्रीबरोबर नात्यात असल्याचं समजलं होतं.
संगीता यांनी पुढे आपल्या दुसरा आरोप करत म्हटलं आहे की, विजय यांनी हे नातं संपवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्या आश्वासनानंतरही कोणताही पश्चाताप न करता अभिनेत्रीबरोबरचे संबंध त्यांनी कायम ठेवले.
विजयच्या पत्नीने पुढे असाही दावा केला की विजयने केवळ संगीताला आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातून दूर केलं नाही, तर तो कथित अभिनेत्रीबरोबर परदेश दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असतो. त्या अभिनेत्रीने या प्रवासाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, विजयने या पोस्ट्सवर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे त्याने अप्रत्यक्षपणे या गोष्टींना पाठिंबा दिल्याचं दिसत असल्याचं संगीता यांनी म्हटलं आहे. तसंच, अशा सोशल मीडिया पोस्ट्समुळे त्यांना आणि त्यांच्या मुलांना वारंवार अपमान सहन करावा लागल्याचंही त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे.
संगीता यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असंही म्हटलं आहे की, विजयने त्यांना आधी मिळणाऱ्या अनेक सुविधा काढून घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांच्या मुक्तपणे येण्या-जाण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या असून आर्थिक निर्बंधही लावले गेले आहेत.
संगीत यांनी विजयवर पाचवा आरोप असा केला आहे की २०२४ मध्ये विजयच्या कथित विवाहबाह्य वागणुकीमुळे आणि सोशल मीडियावर वारंवार झालेल्या वादांमुळे त्यांना गंभीर मानसिक त्रास सहन करावा लागला. संगीता यांनी न्यायालयाला स्पष्ट सांगितलं की, त्यांचं लग्न प्रत्यक्षात पूर्णपणे तुटलं असून ते फक्त कागदोपत्रीच उरलं आहे. संगीताच्या म्हणण्यानुसार, हे नातं पुन्हा पूर्वीसारखं होणं अशक्य आहे आणि या संबंधातून त्यांना मानसिक वेदना, अपमान, तिरस्कार आणि दुःख याशिवाय काहीच मिळालं नाही.
कोण आहेत संगीता?
संगीता या श्रीलंकेतील एका तमिळ व्यावसायिकाच्या कन्या आहेत आणि त्या यूकेमध्ये राहत होत्या. त्या एकेकाळी विजयच्या मोठ्या चाहत्या होत्या. यूकेहून चेन्नईत आलेल्या संगीता यांनी विजयची भेट घेऊन त्याचं कौतुक करण्याचा विचार केला आणि त्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्या. याच भेटीतून दोघांची ओळख वाढली आणि पुढे त्याचं रूपांतर लग्नात झालं. २५ ऑगस्ट १९९९ रोजी विजय आणि संगीताचं लग्न झालं. एका चाहतीने आपल्या आवडत्या अभिनेत्याशी लग्न केल्यामुळे हा लग्नसोहळा त्या काळात खूप चर्चेत राहिला होता.
