Thalapathy Vijay Diet and Fitness: अभिनेते, अभिनेत्री अनेकदा फिटनेससाठी, निरोगी राहण्यासाठी कामाच्या व्यापातून स्वत:साठी वेळ काढत असतात. प्रत्येक कलाकारांचा वेगळा डाएट प्लॅन असतो आणि फिटनेससाठी ते वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती.

विजय थलपती दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला तिथले लोक थलपती म्हणतात. या अभिनेत्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, आता विजय राजकीय क्षेत्रात अधिक सक्रिय असतो आणि त्याने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का वयाच्या ५१व्या वर्षीसुद्धा तो इतका फिट कसा आहे आणि यासाठी काय करतो.

विजयचा शेवटचा चित्रपट ‘जन नायगन’ ९ जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्राला रामराम करत पूर्णवेळ राजकारणात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अभिनय आणि राजकीय करिअरमधून वेळ काढत विजय स्वत:ची काळजी कशी घेतो, फिटनेस कसा जपतो आणि त्याचा डाएट प्लॅन कसा आहे याबद्दल जाणून घेऊयात…

विजय ‘अशी’ घेतो फिटनेसची काळजी

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार विजय बॉडी बिल्डरप्रमाणे स्वत:ला ट्रेन करत नाही, तर तो कार्डिओपासून वर्कआउट करायला सुरुवात करतो. १० ते ४० मिनिटं तो धावतो. कार्डिओमुळे त्याचं हृदय चांगलं राहतं आणि यामधून त्याला अधिक ऊर्जा मिळते. यानंतर तो काही इतर व्यायाम करतो. अनेक सेलिब्रिटी मसल बनवण्याकडे लक्ष देतात, परंतु विजयच्या व्यायामाचं वेळापत्रक अगदी साधं आहे. त्याचा ट्रेनर मध्यम वजनांसह जास्त रिपिटेशन्सवर भर देतो, यामुळे दुखापतीचा धोका टाळत ताकद आणि शरीराची पोश्चर सुधारण्यास मदत होते.

विजयचा आहार कसा असतो?

विजय घरगुती जेवण खातो. तो सकाळी नाश्त्याला इडली, अंडी, फळं आणि पिनट बटर खाऊन दिवसाची सुरुवात करतो. सकाळी तो नारळाचं पाणीही पितो, जेणेकरून त्याला दिवसभर ऊर्जा मिळते. लंचला तो कार्बस आणि प्रोटीन असलेले पदार्थ खातो, त्यामुळे त्याचं जेवण संतुलित असतं. दुपारी तो भात, भाज्या आणि मासे, चिकन, सूप आणि सलाड हे पदार्थ खातो, ज्यामुळे तो तंदुरुस्त आणि निरोगी राहतो. विजयच्या फिटनेसमागचं एक कारण म्हणजे त्याची मनोवृत्ती. विजय अतिप्रमाणात व्यायाम करत नाही, काही चुकीचे पदार्थ खात नाही.

दरम्यान, सध्या विजय त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप तिने केले आहेत आणि पोटगीचीही मागणी केली आहे.