तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय व त्यांच्या पत्नी संगीता यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. संगीता यांनी शुक्रवारी न्यायालयातून आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली. या बातमीनंतर विजय यांच्या एका मुलाखतीची चर्चा होत आहे. त्यात त्यांनी आई-वडिलांनी पसंत केल्यामुळे संगीताशी लग्न केलं होतं, असं म्हटलं होतं.
‘सिनेस्ट्रीट’ने विजय यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यात प्रेमविवाहाबद्दलचं त्यांचं मत विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं, ते जाणून घेऊयात. “आमचा प्रेमविवाह नव्हता. मी लग्नासाठी कधीही माझ्या आई-वडिलांच्या विरोधात गेलो नाही. माझ्या आई-वडिलांनी निवडलेल्या मुलीशीच मी लग्न केलं. मी नेहमी माझ्या चाहत्यांना सांगतो की, आई-वडिलांनी निवडलेल्या जोडीदाराशी लग्न करा, आयुष्य सुंदर होईल,” असं विजय म्हणाले होते.
विजय व संगीता यांची पहिली भेट ते लग्न
१९९० च्या दशकात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजय यांची भेट संगीता सोर्नालिंगमशी झाली होती. संगीता या विजयच्या चाहत्या होत्या आणि खास त्यांना भेटण्यासाठी यूके इथून चेन्नईला आल्या होत्या. यानंतर त्यांची मैत्री हळूहळू नात्यात बदलली. विजय यांनी संगीता यांची ओळख आई-वडिलांशी करून दिली. त्यांनी संगीता यांना मुलासाठी पसंत केलं. त्यानंतर या जोडप्याने २५ ऑगस्ट १९९९ रोजी चेन्नईमध्ये लग्न केलं. त्यापूर्वी १९९८ मध्ये यूकेमध्ये आपल्या लग्नाची नोंदणी केली होती. त्यांना जेसन संजय हा मुलगा आणि दिव्या साशा ही मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

संगीता सोर्नालिंगम यांनी विजय यांच्यावर केलेले आरोप
संगीता लग्न करून चेन्नईत राहिल्या आणि संसारात रमल्या. त्या विजयबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांनाही क्वचितच दिसायच्या. २६ वर्षांच्या संसारानंतर अचानक फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात विशेष विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. संगीता यांनी आपल्या याचिकेत विजय यांचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. २०२१ मध्ये अफेअरबद्दल पहिल्यांदा समजलं, विजय यांनी ते अफेअर संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तसं केलं नाही. त्यानंतर वैवाहिक जीवनात दुरावा, अपमानास्पद वागणूक आणि उपेक्षा सहन करावी लागली, असा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल खूप चर्चा झाली. या निवडणुकीत विजय यांनी विजय मिळवला आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयातील सुनावणीदरम्यान संगीता यांनी आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली. संगीता सुनावणीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्या आणि याचिका मागे घेत असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
