जोसेफ विजय, म्हणजेच तमिळ सुपरस्टार थलपती विजयने ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या राजकीय पक्षाची स्थापना करून राजकारणात सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच तो यापुढे अभिनय करणार नाही. प्रचंड लोकप्रियता व यश मिळवणारा विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने घटस्फोट मागितला आहे. विजयचा अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास, तसेच त्या त्याची संपत्ती, कार कलेक्शन याबद्दल जाणून घेऊयात.
विजयची संपत्ती व उत्पन्नाचे स्त्रोत
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे ६०० कोटी रुपये आहे. तो सर्वाधिक कमाई चित्रपटाच्या मानधनातून करतो. विजय भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचबरोबर तो जाहिराती, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि चित्रपट निर्मितीच्या व्यवसायातून मोठी कमाई करतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि आखाती देशांमध्ये त्याचे चित्रपट खूप चालतात, त्यामुळे त्याचा फायदाही विजयला होतो.
विजयचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला
विजयच्या लाइफस्टाइलपैकी सर्वात चर्चेत राहणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याचा बंगला. चेन्नईतील नीलांकरई इथे समुद्रकिनाऱ्यावर त्याचा भव्य पांढरा शुभ्र बंगला आहे. त्याच्या बंगल्यातून अथांग पसरलेला समुद्र दिसतो. त्याचा हा बंगला खूपच सुंदर आहे. या बंगल्याच्या डिझाईनची प्रेरणा हॉलीवूड स्टार टॉम क्रूझच्या बीच हाऊसच्या डिझाइनवरून घेतली आहे, असं म्हटलं जातं. हा बंगला खूपच प्रशस्त आहे. तसेच त्याचा साधा पांढरा रंग खास लक्ष वेधून घेतो. या बंगल्याबरोबरच त्याची इतरही घरं आहेत.
विजयकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन
विजयच्या गाड्यांचे कलेक्शन खूपच लक्झरी व प्रीमियम आहे. त्याच्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक म्हणजे ‘रॉल्स-रॉयस घोस्ट’ (Rolls-Royce Ghost) आहे. विजयकडे बीएमडब्ल्यू BMW X5 आणि X6, Audi A8 L, रेंज रोव्हर इव्होक (Range Rover Evoque), Volvo XC90, मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) मॉडेल्स आणि फोर्ड मस्टँग (Ford Mustang) यासारख्या महागड्या गाड्या आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या कार कलेक्शनची एकूण किंमत ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
विजय व संगीताचा घटस्फोट
थलपती विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. विजयचं एका अभिनेत्रीबरोबर अफेयर असल्याने घटस्फोट हवाय, असं तिने याचिकेत म्हटलं आहे. विजयने विवाहबाह्य संबंध संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते पूर्ण केलं नाही. तसेच त्याने भावनिकरित्या दुर्लक्ष केल्याचा आरोपही संगीताने विजयवर केला आहे. हे नातं फक्त कागदोपत्री उरल्याने घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी तिने केली आहे.
विजयची पत्नी संगीत सोर्नालिंगम कोण आहे?
संगीता सोर्नालिंगम ही एका श्रीलंकन उद्योगपतीची लेक आहे. तिच्या वडिलांचा लंडनमध्ये व्यवसाय आहे. संगीता ही लंडनला निघून गेली असून वडिलांचा व्यवसाय सांभाळतेय, अशी माहिती समोर आली आहे. संगीताची नेटवर्थ ४०० कोटी आहे, असं म्हटलं जातं.
