थलपती विजय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली (पूर्व) या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. विजयने सोमवारी, ३० मार्च रोजी पेरांबूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विजयने निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे.
थलपती विजयची एकूण संपत्ती ६०३.२० कोटी रुपये आहे. यामध्ये विविध बँक खात्यांमधील २१३ कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, विजयकडे BMW 530, टोयोटा लेक्सस, टोयोटा वेलफायर आणि BMW i7 सारख्या महागड्या गाड्या आहेत. तर, त्याची पत्नी संगीताने १५.७६ कोटी रुपयांची स्वतंत्र मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये १५.५१ कोटी रुपयांची जंगम आणि २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
गेल्या महिन्याच्या संगीताने विजयपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप तिने केला होता. याचदरम्यान विजयने प्रतिज्ञापत्रात पत्नीची संपत्ती व तिला दिलेल्या कर्जाच्या रकमेचा उल्लेख केला आहे.
विजयच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
विजयकडे ४०४.५८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर १९८.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्या स्थावर मालमत्तेमध्ये कोडाईकनल येथील शेतजमीन आणि चेन्नईतील विविध व्यावसायिक व निवासी इमारतींचा समावेश आहे. त्याच्या वैयक्तिक जंगम मालमत्तेत २ लाख रुपये रोख, ८८३ ग्रॅम सोनं आणि १५ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. २०२४-२५ च्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या माहितीनुसार, त्याचे एकूण उत्पन्न १८४.५३ कोटी रुपये आहे. अभिनय, व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि घरांचं भाडं हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.
विजयने कोणाला, किती कर्ज दिलंय?
विजयवर कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज नाही. मात्र, त्याने अनेकांना कर्ज दिले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद माहितीनुसार, TVK पक्षाचे सरचिटणीस एन. आनंद यांना त्याने ३ कोटी रुपये दिले आहेत. पत्नी संगीताला १२.६० कोटींचे कर्ज दिले आहे, ३ कोटी त्याने वडिलांना दिले आहेत, ८.७१ लाख त्याच्या आईला, ८.७८ लाख त्याचा मुलगा जेसन संजयला आणि मुलगी दिव्या साशा हिला ४.६० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय, त्याने ए.एल.पी. अँटोनियस ब्रिटो आणि कोकिलांबल एज्युकेशनल ट्रस्टला प्रत्येकी २० कोटी रुपये, तर विद्या चॅरिटेबल ट्रस्टला ५.८४ कोटी रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले आहेत.
विजयचे शिक्षण
विजयने प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षांचा विजय पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच त्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी कधीही दोषी ठरवण्यात आलेलं नाही. १९८९ आणि १९९१ मध्ये अनुक्रमे १० वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. १९९२ मध्ये चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये बी.एससीसाठी त्याने प्रवेश घेतला होता, पण नंतर शिक्षण सोडलं.
दरम्यान, तामिळनाडू विधानसभेच्या २०२६ च्या निवडणुका २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत. “मी माझे ऐशोआरामाचे जीवन सोडून फक्त तुमच्यासाठी, तुमचे ऋण फेडण्यासाठी इथे आलो आहे. माझ्या मनातील सर्व वेदना सहन करत मी केवळ तुमच्यासाठी उभा आहे. मी खोटं बोलून तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही,” असं विजय २९ मार्चला म्हणाला. या निवडणुकीत सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि त्याचा पक्ष तमिळगा वेत्री कळघम यांच्यात थेट लढत असेल, असं वक्तव्यही त्याने केलंय.
