Thalapathy Vijay Income and Wealth: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आता तामिळनाडूच्या राजकारणातील नवा ‘चाणक्य’ ठरलेला थलापती विजय सध्या त्याच्या घवघवीत यशामुळे चर्चेत आहे. अवघ्या दीड वर्षात राजकीय पक्षाची स्थापना करून त्याने प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. विजय मागील ३ दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे करणारा थलपती विजय राजकारणातही सुपरस्टार ठरला आहे. ५२ वर्षांच्या विजयने पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून त्याच्या अफाट संपत्तीचा खुलासा झाला आहे.

थलपती विजयने त्याच्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्तीबद्दल माहिती दिली होती. विजय ६०३.२० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. यामध्ये विविध बँक खात्यांमधील २१३ कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, विजयकडे BMW 530, टोयोटा लेक्सस, टोयोटा वेलफायर आणि BMW i7 सारख्या महागड्या गाड्या आहेत. तर, त्याची पत्नी संगीताने १५.७६ कोटी रुपयांची स्वतंत्र मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये १५.५१ कोटी रुपयांची जंगम आणि २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

विजयच्या उत्पन्नाचे स्रोत

विजयकडे ४०४.५८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर १९८.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्या स्थावर मालमत्तेमध्ये कोडाईकनल येथील शेतजमीन आणि चेन्नईतील विविध व्यावसायिक व निवासी इमारतींचा समावेश आहे. त्याच्या वैयक्तिक जंगम मालमत्तेत २ लाख रुपये रोख, ८८३ ग्रॅम सोनं आणि १५ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. २०२४-२५ च्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या माहितीनुसार, त्याचे एकूण उत्पन्न १८४.५३ कोटी रुपये आहे. अभिनय, व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि घरांचं भाडं हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.

विजयने घरातील सदस्यांना दिलंय कर्ज

विजयवर कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज नाही. मात्र, त्याने अनेकांना कर्ज दिले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद माहितीनुसार, TVK पक्षाचे सरचिटणीस एन. आनंद यांना त्याने ३ कोटी रुपये दिले आहेत. पत्नी संगीताला १२.६० कोटींचे कर्ज दिले आहे, ३ कोटी त्याने वडिलांना दिले आहेत, ८.७१ लाख त्याच्या आईला, ८.७८ लाख त्याचा मुलगा जेसन संजयला आणि मुलगी दिव्या साशा हिला ४.६० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय, त्याने ए.एल.पी. अँटोनियस ब्रिटो आणि कोकिलांबल एज्युकेशनल ट्रस्टला प्रत्येकी २० कोटी रुपये, तर विद्या चॅरिटेबल ट्रस्टला ५.८४ कोटी रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले आहेत.

विजयने प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षांच्या विजयने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि इतकं मोठं यश मिळवलं. विजयवर कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच त्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी कधीही दोषी ठरवण्यात आलेलं नाही.