Thalapathy Vijay Son Jason Sanjay’s Movie Sigma Release Date : थलपती विजय हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता यापुढे त्यांचे चित्रपट पाहता येणार नसल्याने त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली, पण आता जोसेफ विजय यांनी जरी अभिनयाला राम राम केला असला तरी त्यांचा मुलगा मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.
जोसेफ विजय यांचा मुलगा जेसन संजय हा दिग्दर्शक म्हणून लवकरच पदार्पण करणार आहे. त्याचं दिग्दर्शन असलेला ‘सिगमा’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. जोसेफ विजयच्या मुलाचा हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि त्यात कोणते कलाकार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
कधी रिलीज होणार?
नुकतच आज २९ मे (शुक्रवारी) ‘सिगमा’च्या निर्मात्यांनी घोषणा केली की, संदीप किशन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट ३१ जुलै रोजी जगभरातील थिएरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा जेसन संजय(Jason Sanjay) याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट आहे. त्यानेच चित्रपटाचं लिखानही केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती लिसा प्रोडक्शनचे (Lyca Productions) प्रमुख सुभास्करन यांनी केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार अलीकडेच दिग्दर्शक जेसन संजयने सांगितलं की, त्याच्या या चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, ट्रेझर-हंट आणि हायस्ट यांचं भन्नाट समीकरन पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना खूपच चांगला सिनेमॅटिक अनुभव मिळेल.
‘सिगमा’ या चित्रपटात संदीप किशनबरोबर फरिया अब्दुल्ला, राजु सुंदरम, संपथ राज, शिव पंडीत, अन्बू थासन, योग जपी, मगलक्ष्मी, शीला राजकुमार, कमलेश आणि किरण कोंडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच कलील राजा, संजीव एस आणि अजय अशोक यांनी अतिरिक्त पटकथा लेखक म्हणून काम केले आहे.
तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचं झाल्यास, माध्यमांच्या वृत्तानुसार ‘सिगमा’ या चित्रपटाला (थामन एस) Thaman S यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटाचं छायांकन कृष्णन वसंत यांनी केलं असून, एडिटींग प्रवीण केएल यांनी केली आहे. ‘सिगमा’चं शूटिंग चेन्नई, थायलंड, थालकोना आणि सालेमसह अनेक ठिकाणी पूर्ण झालं आहे. मात्र, चित्रपटाला अद्याप सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळालेलं नाही. विशेष म्हणजे, विजय यांचा अखेरचा चित्रपट ‘जन नायगन’ च्याही सेन्सॉर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत आणि चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा आहे. काही रिपोर्टनुसार, ‘जन नायगन’ जूनच्या मध्यात प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, निर्मिती संस्था KVN Productions यांनी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
