Thalapathy Vijay Son Jason Sanjay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते विजय यांचा मुलगा जेसन संजय सध्या त्याच्या दिग्दर्शकीय पदातील पदार्पणामुळे चर्चेत आहे. जेसनने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘सिग्मा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत २५ वर्षांच्या जेसनने आपले कुटुंब, आई संगीता आणि बहीण दिव्या साशा हिच्याबरोबरच्या नात्यावर भाष्य केले. वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर कुटुंबावरील जबाबदारी वाढली असून बहिणीचे रक्षण करणे हे आपले मुख्य कर्तव्य असल्याचे त्याने सांगितले. तसेच, आईला न सांगता रात्री घरातून कार घेऊन पळून गेल्याचा एक किस्साही त्याने शेअर केला.
बिहाइंडवुड्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत जेसन संजय म्हणाला, “मी आणि माझी बहीण रोज बोलतो. जेव्हापासून आम्ही एका घरात राहत नाही, तेव्हापासून आमचं नातं आणखी घट्ट झालंय.”
जेसन चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला होता. घरापासून लांब असूनही, तो व्हिडीओ कॉलद्वारे सतत बहिणीच्या संपर्कात असायचा. जेसनने सांगितलं की, त्याच्या बहिणीला चित्रपटांची चांगली समज आहे आणि ती नेहमी प्रामाणिकपणे तिचं मत मांडते. ‘सिग्मा’ चित्रपटाची कथा सर्वात आधी तिनेच ऐकली होती आणि तिच्या सूचनेमुळे चित्रपटाची स्क्रिप्ट आणखी चांगली झाली.
जेसनला झाली जबाबदारीची जाणीव
आपल्याला एका जबाबदारीची जाणीव झाल्याचं मुख्यमंत्री विजय यांच्या मुलाने सांगितलं. वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर कुटुंबाकडे लोकांचे लक्ष असते. त्यामुळे बहिणीची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं जेसनचं म्हणणं आहे.
“मला तिची काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वेळी तिच्या तिचं रक्षण करावं लागतं आणि तिला योग्य मार्ग दाखवावा लागतो. इतक्या कमी वयात ही खूप मोठी जबाबदारी आहे,” असं जेसन संजय म्हणाला.
जेसन आई संगीताबद्दल म्हणाला…
जेसन संजयने त्याची आई संगीता यांच्या एका खास कौशल्याबद्दलचा किस्साही शेअर केला. “माझी आई एखाद्या डिटेक्टिव्हपेक्षा कमी नाही. जेव्हा जेव्हा मी लपून कुठे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी पकडलाच जातो,” असं तो म्हणाला.
जेसनने एक जुनी आठवण सांगितली. एकदा रात्री तो कोणालाही न सांगता कार घेऊन बाहेर पडला होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता. “एकदा रात्री घरातील सर्वजण झोपल्यावर मी कोणालाही न सांगता गाडी घेऊन बाहेर पडलो आणि सकाळी परत आलो. माझा मोबाईल फोन बंद होता. घरचे पोलिसांत मी हरवल्याची तक्रार दाखल करणारच होते. मग जेव्हा मी सकाळी परत आलो, तेव्हा घरात खूप मोठा गोंधळ झाला होता,” असं जेसनने सांगितलं.
‘जन नायकन’ चित्रपटामुळे ‘सिग्मा’चं प्रदर्शन पुढे ढकललं
जेसन संजय दिग्दर्शित ‘सिग्मा’ या चित्रपटात संदीप किशन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शन्सने केली आहे. हा चित्रपट आधी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु वडील विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाशी टक्कर टाळण्यासाठी त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आता चाहते सिग्माच्या नवीन रिलीज डेटची वाट पाहत आहेत.
