Thalapathy Vijay TVK Election Results 2026: तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जात आहे. अभिनेता थलापती विजयच्या ‘TVK’ पक्षाने सुरुवातीच्या कलानुसार १०६ जागांवर आघाडी मिळवत सत्तेचे सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत. एकीकडे विजयच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री त्रिशा कृष्णन आज त्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे. आज त्रिशाचा वाढदिवस असून तिने सकाळी तिरुपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर ती थेट विजयला भेटायला आली. याच निमित्ताने विजय आणि त्रिशाचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे, ज्यामध्ये ते एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ‘ट्विनिंग’ करताना दिसत आहेत.
विजयचं अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर अफेअर असल्याचं मागील अनेक महिन्यांपासून म्हटलं जातंय. आज त्रिशाचा वाढदिवस आहे. ती तिरुपतीला दर्शनासाठी गेली होती. पहाटे तिने दर्शन घेतले. तिचा तिरुपतीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी ती विजयच्या विजयासाठी प्रार्थना करायला गेली होती, अशा कमेंट्स केल्या होत्या. त्यानंतर त्रिशा थेट विजयच्या चेन्नईतील घरी पोहोचली.
याचदरम्यान, त्रिशा व विजयचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमने विजयवर अफेअरचे आरोप करत घटस्फोट मागितला. त्यानंतर विजय त्रिशाबरोबर ट्विनिंग करत एका रिसेप्शनला पोहोचला होता, तेव्हाचा त्यांचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे.
पाहा त्रिशा व विजयचा व्हिडीओ
विजय त्रिशाबरोबर उद्योगपती आणि चित्रपट निर्माते कल्पाथी एस. सुरेश आणि मीनाक्षी सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेला होता. महत्त्वाचं म्हणजे विजय आणि त्रिशा या ठिकाणी एकत्र आले होते. त्यांनी नवविवाहित जोडप्याबरोबर फोटो काढले आणि त्यानंतर ते तिथून एकत्रच बाहेर पडताना दिसले. विजयने सोनेरी रंगाचा रेशमी शर्ट आणि पारंपारिक ‘वेष्टी’ परिधान केली होती. त्रिशाने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची रेशमी साडी नेसली होती. त्याला लाल रंगाचे काठ होते. त्यावर तिने स्लिव्हलेस लाल ब्लाऊज आणि गळ्यात सुंदर हार घातला होता.
संगीता सोर्नालिंगमचे आरोप नेमके काय?
विजयचे दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. या संबंधांमुळे आपल्याला प्रचंड मानसिक व भावनिक त्रास झाला आहे. त्याने नात्यात विश्वासघात केला. सुरुवातीला विजयने हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते, पण तरीही ते सुरूच राहिले. सोशल मीडियावरील चर्चांमुळे झालेली बदनामी, भावनिक दुर्लक्ष आणि मानसिक छळ यामुळे आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं तिने अर्जात म्हटलं आहे. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ आणि पुन्हा ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात वकिलांच्या मदतीने आणि आपापसांत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला यश आलं नाही, असं संगीताने म्हटलं होतं.
हे लग्न आता पूर्णपणे मोडले असून ते फक्त कागदोपत्री उरले आहे. त्यामुळे तिने न्यायालयाकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. विजयचे उत्पन्न आणि सामाजिक दर्जा लक्षात घेऊन कायमस्वरूपी पोटगी मिळावी, अशी मागणी तिने केली आहे. तसेच, जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत नीलंकरई येथील सासरच्या घरी राहण्याचा अधिकार किंवा त्याच दर्जाची दुसरी राहण्याची व्यवस्था विजयने करून द्यावी, अशी मागणी संगीताने केली होती.
