सध्या सर्वत्र ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिवलची धामधूम सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवले जात आहे. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या अभिनेता आर माधवन याने देशातील सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

या महोत्सवादरम्यान बोलताना आर माधवन म्हणाला, “आपल्या देशात डिजीटलायझेशन होणे हे एक मोठे संकट असेल अशी शंका जगाला वाटत होती. आपल्या देशात शेतकऱ्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा, व्यवहार कसे करायचे याची काहीही माहिती नव्हती. पण गेल्या काही वर्षात हे दृष्य पूर्णपणे बदलले आहे. भारत हा सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा वापरकर्ता बनला आहे.”

“कारण शेतकऱ्यांना फोनचा वापर करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज नाही. त्यांना पैसे मिळाले आहे की नाही, यासाठी त्यांना काहीही वेगळे करावे लागले नाही. हा नवीन भारत आहे. जेव्हा पंतप्रधानांनी त्यांचा कार्यकाळ सुरू केला, तेव्हा त्यांनी मायक्रो-इकॉनॉमी आणि डिजीटल चलन आणले. यामुळे आर्थिक जगतात खळबळ उडाली होती. हे चालणार नाही, हे एक संकट ठरेल असेही त्यावेळी काहींनी म्हटले होते”, असेही आर माधवन म्हणाला.

माधवनचा हा व्हिडीओ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आर माधवनने हा रोख रक्कम या पैशाचा कमी वापर करत डिजीटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रगतीबद्दलही भाष्य केले आहे.

या वर्षीच्या कान्स महोत्सवामध्ये भारताला कंट्री ऑफ ऑनर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात भारतीय संघाचे नेतृत्व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. त्यासोबतच आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, शेखर कपूर, प्रसून जोशी आणि इतर व्यक्तीही कान्स महोत्सवात उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी या चित्रपट महोत्सवातील अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती.