मल्याळम अभिनेत्री कानी कुसृतीनं पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’मधील तिच्या अभिनयासाठी जागतिक लोकप्रियता मिळवली. या चित्रपटानं गेल्याच आठवड्यात कान फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival) ऐतिहासिक ग्रँड प्रिक्स हा पुरस्कार पटकावला. आता या अभिनेत्रीने एका मुलाखतीत उघड केलं की, तिला कमी चित्रपट ऑफर होत असूनही तिनं ‘द केरला स्टोरी’च्या ऑडिशनसाठी नकार दिला होता.

नुकत्याच मनोरमा ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत, कानी म्हणाली, “मी फक्त माझ्याकडे येणारे चित्रपट स्वीकारू शकते. कारण- मला चित्रपटांच्या ऑफर खूपच कमी येतात. जर मला काम मिळालं नाही, तर मला माझ्या विचारांशी मेळ न खाणारे चित्रपट करावे लागतील.”

हेही वाचा… VIDEO: मृण्मयी देशपांडेला मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज; म्हणाली, “शाळेनंतर खूप वर्षांनी…”

साजिन बाबू दिग्दर्शित २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिरियानी’ या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी केरळ राज्य पुरस्कार मिळाल्यानंतरही तिला खूप कमी चित्रपटांची ऑफर मिळाली. तथापि, ती असंही म्हणाली की, ती तिच्या विचारांशी मेळ न खाणारे चित्रपट न करण्याचाच प्रयत्न करते. यादरम्यान तिनं उघड केलं की, गेल्या वर्षीच्या ‘द केरला स्टोरी’ ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा ऑडिशन कॉल नाकारला होता.

‘बिरियानी’ चित्रपटाबद्दल सांगताना कानी म्हणाली, “मी साजिनला सांगत होते की माझं व्यक्तिमत्त्व या स्क्रिप्टशी जुळत नाहीय. साजिन हा मागासलेल्या मुस्लिम समाजातून येतो आणि चित्रपटाद्वारे त्याची गोष्ट तो बरोबर सांगतो.”

हेही वाचा… “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण…”, गौरी खानचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, म्हणाली…

द केरला स्टोरी

५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. तर सिद्धी इदनानी, योगिता बिहानी, सोनिया बालानी यांच्या निर्णायक भूमिका या चित्रपटात आहेत. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतर आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती, असा गंभीर विषय या चित्रपटाचा आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. १५ ते २० कोटींच्या बजेटमधल्या या चित्रपटानं ३०० कोटींहून अधिक कमाई केली.

दरम्यान, कानी कुसृतीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, कानीनं ‘वाझक्कू’, ‘किर्कन, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ अशा अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम तर केलंच आहे. परंतु, अनेक हिंदी, तेलुगू, तमीळ भाषिक चित्रपटांमध्येदेखील तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.