मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये आत्ता कुठे विविध विषय हाताळण्यास सुरुवात झाली असली, तरी अशा हटके विषयांसाठी लघुपट आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. दर वेळी असे वेगवेगळे विषय लघुपटांच्या माध्यमातून पुढे आणण्यात प्रसिद्ध असलेल्या फिल्म्स डिव्हिजनने पुन्हा एकदा अशाच वेगळ्या विषयावरचा लघुपट तयार केला आहे. अंजोली पुरत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा विषय आहे ‘त्वचा दान’! भारतात अजूनही फारसे प्रसिद्ध नसलेले हे तंत्रज्ञान नेमके आहे काय, याचा परामर्श ‘द बर्निग स्टोरी’ नावाच्या या लघुपटात घेण्यात आला आहे.मानवाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचा टप्पा मानण्यात येणाऱ्या आगीचा शरीराशी संपर्क आला की, साहजिकच त्वचा जळते. मग हा चट्टा आणि ही खूण आजन्म अंगावर बाळगून जगताना अनेकदा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी अनेकदा ज्याला भाजले आहे, त्याच्याच इतर अवयवांजवळील त्वचा काढून जखम भरली जाते. मात्र अनेकदा हे करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्वचा दान ही संकल्पना आता बळावत चालली आहे. या संकल्पनेवर लघुपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण केला आहे, अंजोली पुरत यांनी सांगितले.त्वचा दान म्हणजे काय, भाजल्यानंतर रुग्णावर नेमका कसा इलाज केला जातो, कोणत्या प्रकारचा इलाज करावा लागतो, याबाबतची माहिती या लघुपटात देण्यात आली आहे. या लघुपटात दोन सत्यकथांचे नाटय़चित्रण करण्यात आले आहे. पहिली कथा ही भाजण्यापासून वाचलेल्या महिलेची कहाणी आहे. तर दुसऱ्या कथेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाची त्वचादान व नेत्रदान करणाऱ्या आईची गोष्ट सांगितली आहे. सामान्य लोक आपल्या मृत्युनंतर त्वचादान करून एखाद्याला नवीन जीवन देऊ शकतात, असा संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आल्याचे पुरत यांनी सांगितले.