घुसमटीतून बाहेर पडण्याची धडपड

क्राऊ न वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचे कथानक बहुतांशपणे राजवाडय़ाबाहेरच अधिक आकार घेते.

क्राऊ न वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचे कथानक बहुतांशपणे राजवाडय़ाबाहेरच अधिक आकार घेते. एव्हाना राणी सर्व रीतीरिवाज आणि चाकोरीबद्धतेला बऱ्यापैकी सरावलेली असते. तिच्या विहित कर्तव्यापोटी तिने अगदी गृहकलहदेखील ओढवून घेतलेला असतो. दरम्यान सुएझ कालव्यावरील ब्रिटिशांचे नियंत्रण इजिप्तने उलथून टाकलेले असते, आफ्रिकेतील कॉमनवेल्थमधील राष्ट्रांचीदेखील धुसफुस सुरू असते, अमेरिका तुलनेने दुरावू लागलेला असतो, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना वातावरण ढवळून काढत असतात. तर दुसरीकडे राजघराण्यातील अंतर्गत बाबींमध्येदेखील बऱ्याच घडामोडी घडतात. आणि राणीदेखील या सर्वातून जरा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करत असते. एकप्रकारे मुकुटातील घुसमटीतून बाहेर पडण्याची धडपड त्यात जाणवते.

नेटफ्लिक्सवरील क्राऊ न या वेबसिरीजचा दुसरा सीझन २०१७ च्या डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनची तुलना करायची नाही, पण पहिला सीझन हा नक्कीच उजवा वाटावा असा आहे. दुसऱ्या सीझनमध्ये कथानकाला राजवाडय़ाच्या फ्रेममधून बाहेर काढताना सिरीजकर्त्यांने अनेक घटना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही घटनांच्या सादरीकरणाला चांगलेच यश लाभले आहे, पण काही घटना वेळखाऊ  वाटतात. तरीदेखील केवळ राणीवरच कथानक केंद्रित न ठेवता तिचा नवरा फिलिप, तिचा मोठा मुलगा चार्ल्स, बहीण मार्गारेट यांना बराच वाव मिळाला आहे हे मात्र नक्की. दरम्यान ती आणखीन दोन मुलांना जन्म देते. बहीण मार्गारेटच्या लग्नाच्या अनुषंगाने निर्माण झालेले यापूर्वीचे वादळ या सीझनमध्ये शांत होते. पण काका म्हणजेच पूर्वाश्रमीचा राजा डेव्हिड याचा पुनरागमनाचा प्रयत्न अनेक विचित्र रहस्यांना उलगडून एक नवीनच वादळ उभे करतो. दुसरीकडे फिलिपच्या ऑस्ट्रेलिया शासकीय दौऱ्याचा एपिसोड तर या सिरीजला थेट समुद्रावरच घेऊ न जातो. मूळचा नौदल अधिकारी असलेला फिलिप हा राजप्रासादात कोंडल्यासारखा झालेला असतो. खरे त्याला थेट काही अधिकार नाहीत आणि बंधने अधिक अशी त्याची अवस्था असते. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात त्याला काहीतरी हरवलेले गवसल्याचे समाधान मिळते. पण त्याच दौऱ्यातील काही घटनांमुळे पुन्हा एकदा फिलिप आणि राणीमध्ये तणाव निर्माण होतो.

आंतरराष्ट्रीय घटनांचा थेट फटका राणीला फारसा बसत नाही. पण त्यातील ठरावीक घटनांमुळे ती काही गोष्टी स्वत:हून करताना दिसते. मंत्रिमंडळाची नाराजी असताना ती घानाच्या दौऱ्यावर जाते. एकंदरीतच तो काळ ब्रिटिश साम्राज्याच्या उतरणीचा. त्यात राणीने घानामध्ये जाऊ न तेथील राष्ट्राध्यक्षांसोबत नृत्य करणे याला चांगलीच प्रसिद्धी मिळते. राणीने हे पाऊ ल उचलण्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या पत्नीच्या इंग्लंडच्या दौऱ्यातील कौतुकातून निर्माण झालेली असूया कारणीभूत असल्याचा सूर लावण्यात आला आहे. यातील काही घटनांबाबत इतिहासाची मोडतोड केल्यावरून या एपिसोडवर टीकासुद्धा झाली आहे. मात्र हे सारे प्रसंग सिरीजच्या चढत्या भाजणीसाठी चांगलेच उपयोगी पडले आहेत.

राणीची अशी धडपड सुरू असली तरी तिच्या काही रटाळ चाकोरीबद्ध कामाच्या बंधनातून घडणारा एक प्रसंग या सीझनमध्ये पाहायला मिळतो. कार्यालयाने दिलेले छापील भाषण हा तो रटाळ प्रकार. पण समाजातील बदलांशी नाळ तुटली की काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणून ते पाहावे लागेल. राणीच्या या भाषणाचे एका नियतकालिकाच्या संपादकाकडून चांगलेच वाभाडे काढले जातात. परिणामी राणीला जनतेपासून तुटलेपणाची कसर भरून काढण्याची संधीच मिळते. राणीला तिच्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ही टीका साहाय्यभूत ठरते. हे सारे प्रकरण राजवाडा बदलतोय याची जाणीव करून देते.

एकूणच या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक घटनांचा भरणा आहे. त्यामुळे राजवाडय़ात ज्या पद्धतीने कॅमेरा फिरतो तसा वाव येथे कमीच आहे. पण बाह्य चित्रीकरणातून ब्रिटनचा निसर्ग चांगलाच पकडला आहे. फिलिपच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या चित्रीकरणामुळे एकूणच आजवरच्या बंदिस्तपणापासून जरा मोकळीक मिळते. या संपूर्ण सीझनमध्ये अनेक प्रसंग असल्यामुळे जवळपास प्रत्येक भाग वेगवेगळा असल्यासारखे असताना, त्यात एकसूत्रता कायम ठेवण्यात अगदी पूर्ण नाही पण माफक प्रमाणात का होईना यश मिळाले आहे.

जरी या दुसऱ्या सीझनमध्ये संवाद, संकलनात फार काही आकर्षकपणा नसला तरी सिरीजवरील पकड सुटत नाही. त्याचे श्रेय दिग्दर्शकाने निवडलेले प्रसंग आणि त्याची मांडणी याला द्यावे लागेल. यामध्ये फार काही रॉयल असे सोहळे नाहीत की प्रचंड मोठी उलथापालथ नाही. पण जे काही मोजके क्षण आहेत त्यात नावीन्य आहे हे मात्र नक्की. या नावीन्यातूनच कथानक पुढे सरकते हे येथे नमूद करावे लागेल. आता साम्राज्य असं म्हणून काही राहिलेलं नाही, पण राजसत्ता मात्र आहे या काळातली ही परिस्थिती आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या घटना काहीशा चिकित्सक नजरेने पाहण्यासाठी क्राऊ न सिरीजचा हा दुसरा सीझन पाहायला हवा हे नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The crown drama series

ताज्या बातम्या