ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरी सुमन कल्याणपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील आणि भावगीत विश्वातील ध्रुवतारा निखळला आहे. संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीत विश्वात त्यांनी दिलेलं योगदान हे मोलाचं ठरलं. २०२३ मध्ये सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म भवानीपूरमधला

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३८ रोजी भवानीपूरमध्ये झाला होता. भवानीपूर हे अविभाजित भारतात होतं. सध्या हे ठिकाण बांगलादेशात आहे. लहान असल्यापासूनच सुमन कल्याणपूर यांना गाण्याची प्रचंड आवड होती. सुमन कल्याणपूर यांचं माहेरचं आडनाव हेमाडी असं होतं. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सुमन हेमाडी या नावानेच पार्श्वगायन करत असतं. त्यांची सुरुवातीची गाणी याच नावाने लोकप्रिय झाली. सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदी, बंगाली, उडिया पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा भाषांमध्ये गाणी गायली. गझल, ठुमरी, भक्तीगीतं आणि भावगीतं गाण्याची त्यांना विशेष आवड होती. सुमन हेमाडींचे वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामधअये वरिष्ठ पदावर होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. मुंबईत त्यांच्या कला प्रवासाची सुरुवात झाली. सुमन हेमाडी यांना चित्रकलेचीही आवड होती.

गझल सम्राट तलत महमूद यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज ऐकला आणि ते भारावले

सुमनताईंचा सिनेसृष्टीतील प्रवेश एखाद्या चित्रपटासारखाच रंजक होता. गझल सम्राट तलत महमूद यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांचा आवाज ऐकला आणि ते भारावून गेले. त्यांनी सुमनताईंना स्वत:च्या चित्रपटात गाण्यासाठी विचारणा केली. सुमनाताईंनी देखील ही संधी सोडली नाही. त्यांनी गाण्याला होकार दिला आणि ‘कोई पुकारे धीरेसे तुझे’ या पहिल्याच गाण्याने त्यांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. तर मराठीतील भावगीत गायनाची सुरुवात ग. द. माडगुळकर यांच्या गीतांनी केली.

हिंदी आणि मराठीतली अजरामर गाणी गायली

सुमन कल्याणपूर यांनी हिंदी गाणीही गायली. त्या काळातल्या आघाडीच्या गायिका लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या बरोबरीचं स्थान सुमन कल्याणपूर यांनी निर्माण केलं होतं यात शंकाच नाही. ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘नाविका रे, वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, ‘देव माझा विठु सावळा’ अशी एकाहून एक सरस गाणी त्यांनी मराठीत गायली होती. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ हे बालगीत तर आजच्या पिढीतल्या लहान मुलांच्या तोंडावरही रुळलं आहे.

Suman Kalyanpur Death
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं मुंबईत निधन.(फोटो-सोशल मीडिया)

अशोक पत्की यांनी सुमन कल्याणपूर यांच्याबाबत काय म्हटलं होतं?

संगीतकार अशोक पत्कींनी सुमन कल्याणपूर यांची आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते की १९६८ चा काळ होता. त्या काळात मला हार्मोनिअम वादक किंवा पेटीवादक म्हणून ओळखलं जात असे. सुमन कल्याणपूर यांच्याकडचे जे पेटीवादक होते ते दुसरीकडे काम करण्यासाठी निघून गेले होते. कुणीतरी सुमन कल्याणपूर यांना माझं नाव सुचवलं. सुमन कल्याणपूर यांचा एक ग्रुपर होता. तो ग्रुप विविध ठिकाणी कार्यक्रम करायचा. त्यासाठी त्यांना पेटीवादक हवा होता. योगायोग असा झाला होता की सुमन कल्याणपूर ज्या इमारतीत राहायला होत्या तेव्हा मी पण त्याच इमारतीत राहायला गेलो. सुमन कल्याणपूर यांनी पेटीवादन ऐकलं आणि त्या आनंदी झाल्या. त्यानंतर मी त्यांच्याकडे वादक म्हणून कामयचा काम करु लागलो. वर्षभरातच वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्या कार्यक्रमासाठी आम्ही सुमारे ५० गाणी निवडली होती. त्या गाण्यांचं नोटेशन काढण्याचं काम मला करायचं होतं. पण नोटेशन कसं काढतात? हे मला माहीत नव्हतं. त्यांच्या ग्रुपमध्ये अरविंद मयेकर सतारवादक होते. नोटेशन काढायला मला त्यांनी शिकवलं. त्यानंतर आम्ही रोज सुमन कल्याणपूर यांच्या घरी जाऊन कार्यक्रमाची पूर्वतयारी करायचो. त्यामुळे माझा आणि त्यांचा चांगला परिचय झाला अशी आठवण अशोक पत्की यांनी सांगितली होती.

Suman Kalyanpur Death
सुमन कल्याणपूर यांनी अनेक गाणी म्हटली आणि ती अजरामर केली यात काही शंकाच नाही. (फोटो-सोशल मीडिया)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया २०२४ ची प्रतिक्रिया काय होती?

सुमन कल्याणपूर यांच्याबाबत २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली होती. ती ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “सुमन कल्याणपूर यांनी १३ भाषांमध्ये गाणी गायली. त्यातल्या कुठल्या गाण्याला चांगलं म्हणावं असा प्रश्न आमच्यासमोर येतो तेव्हा आमच्यासमोर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही आम्हाला त्यात सापडतात. जेव्हा आमच्याकडे अनेक पक्ष येतात तेव्हा तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबाँ पर म्हणावंसं वाटतं. आम्ही जागावाटपाच्या चर्चा करतो तेव्हा म्हणावंसं वाटतं की तुम्हे प्यार करते हैं, करते रहेंगे. निवडणुकीनंतर निकाल पाहून आमचे विरोधक म्हणतील जिंदगी इम्तिहान लेती है.” देवेंद्र फडणवीस यांनी असं जेव्हा म्हटलं तेव्हा कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.