scorecardresearch

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बॉलिवूडला सल्ला; ट्वीट करत म्हणाले, “शून्यातून उभं राहायचं असेल तर…”

याबरोबरच विवेक यांनी बॉलिवूडच्या प्रमोशन करण्याच्या पद्धतीवरही टीका केली.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बॉलिवूडला सल्ला; ट्वीट करत म्हणाले, “शून्यातून उभं राहायचं असेल तर…”
विवेक अग्निहोत्री | vivek agnihotri

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे गेले काही दिवस त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बॉलिवूडच्या कारभारावर टीका करत आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांनी बॉलिवूडच्या इतर चित्रपटांकडे पाठच फिरवली. आता कुठे हळूहळू थोडी गाडी रुळावर येत आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने बऱ्याच मल्टीप्लेक्समध्ये तिकीट दर घटवून ७५ रुपये हा दर ठरवण्यात आला आणि प्रेक्षकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

या उपक्रमाच्या निमित्ताने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चूप’ आणि ‘धोका’ या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला. या निमित्ताने प्रत्येक सिनेगृहाबाहेर हाऊसफूलचे फलक झळकले आणि चित्रपटगृहाच्या मालकांना हायसं वाटलं. याचविषयी भाष्य करत विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाच्या रेसिपीतून तयार झालेली ‘सूप’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आंतरराष्ट्रीय सिनेमा दिवसांच्या निमित्ताने ठिकठिकाणी हाऊसफूलचे बोर्ड झळकले. सिनेअभ्यासक आणि तज्ञ तरण आदर्श यांनी अशाच एका एका हाऊसफूल बोर्डचा फोटो ट्विटरवर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. तरण आदर्शनी शेअर केलेला हा फोटो पुन्हा आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “कमी तिकीट दर, कमी अहंकार, प्रमोशन आणि एयरपोर्ट लूकवर कमी खर्च, जास्तीत जास्त उत्तम कंटेंट आणि जास्तीत जास्त संशोधन…बॉलिवूडला पुन्हा शून्यातून उभं राहायचं असेल तर हाच पर्याय उपलब्ध आहे.”

याबरोबरच विवेक यांनी बॉलिवूडच्या प्रमोशन करण्याच्या पद्धतीवरही टीका केली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केवळ १५ कोटी बजेटमध्ये ‘कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बनवला आणि त्याने तब्बल ३५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली. विवेक आता त्यांच्या पुढील ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटाच्या संशोधनात व्यस्त आहेत. प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीदेखील या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या