गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. नुकतंच या संपूर्ण घटनेवर अभिनेत्री दिया मिर्झाने प्रतिक्रिया दिली आहे.

दिया मिर्झा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. दियाने नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. “धन्यवाद उद्धव ठाकरे, तुम्ही जगाची आणि जनतेची काळजी घेतलीत त्यासाठी तुमचे आभार व्यक्त करते. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला यापुढेही देशसेवेच्या आणखी अनेक संधी मिळू दे”, असे ट्वीट दिया मिर्झाने केले आहे.

तिच्या या ट्वीटला ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रिट्वीट केले आहे. त्यासोबत तिला एक प्रश्नदेखील विचारला आहे. यात त्याने दिया मिर्झाचे ट्वीट रिट्वीट करत तिची खिल्ली उडवली आहे. यावेळी तो म्हणाला ‘कोणते प्लॅनेट? प्लॅनेट बॉलिवूड का?’ असा प्रश्न त्याने तिला विचारला आहे.

दरम्यान विवेकच्या या प्रश्नाला दिया मिर्झाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र विवेक अग्निहोत्रीच्या या ट्वीटनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.