विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. चिन्मयने साकारलेल्या या भूमिकेचे सर्वजण विशेष कौतुक करत आहे. नुकतंच चिन्मयने एका मुलखतीत या चित्रपटासाठीच्या तयारीबद्दल सांगितले आहे. द कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस उलटले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाले. तर काहींच्या अंगावर अक्षरश काटा आला, असे मत प्रेक्षक व्यक्त करत आहे. नुकतंच बिट्टाची भूमिका जिवंत करणाऱ्या चिन्मय मांडलेकरने एबीपी माझा या वाहिनीला मुलाखत दिली. या चित्रपटात काहीही खोटं दाखवलेले नाही. यात घडवलेले किंवा काल्पनिक काहीही नाही, असे चिन्मय मांडलेकरने सांगितले. चिन्मय मांडलेकर नेमकं काय म्हणाला? "चित्रपट हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. मी जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला समजले की १९९० मध्ये जेव्हा हे झाले तेव्हा मी ११ वर्षांचा होतो. पण मला हे काहीही माहिती नव्हते. मला इतकंच माहिती होते की कश्मिरी हिंदू हे त्या ठिकाणाहून निघाले आणि आता ते इथे राहत आहेत. माझे अनेक मित्र जे दिल्लीत राहतात ही एवढीच माहिती होती. पण याची दाहकता किती आहे, हे या चित्रपटाच्या निमित्ताने मला समजले.""मला अनेक प्रेक्षकांनीही सांगितले की एखादा चित्रपट म्हणून आम्ही हे बघत नाही. तर त्याची दाहकता किती आहे, या माध्यमातून आम्ही ते बघतोय. यात काहीही खोटं दाखवलेले नाही. यात घडवलेले किंवा काल्पनिक काहीही नाही, असे मी हे नक्की सांगू शकतो.""पल्लवी जोशींनी त्यावेळी मला सांगितलं होतं की हे पात्र काश्मिरी आहे. त्यावेळीही मला प्रश्न पडला होता की मला हे पात्र का विचारलं जात आहे. मी काश्मिरी लोकांसारखा गोरा दिसत नाही. ऑडिशननंतर मी तो रोल करणार हे निश्चित झाल्यानतंर मी ती पूर्ण स्क्रिप्ट वाचली. त्यानंतर हा रोल किती मोठा आहे, हे मला समजले. ते किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना मला आली आणि त्यानंतर जबाबदारी ही एकच भावना माझ्यासाठी होती.""पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी केलेला रिसर्च कमालीचा आहे आणि त्यांनी तो माझ्यासमोर ठेवला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुला जे वाचायचं आहे, बघायचं आहे ते सर्व साहित्य यात आहे. तू ते वाच, अभ्यास कर आणि त्यानंतर आपण शूटींगला सुरुवात करु. कास्टिंग आणि शूटींगदरम्यान मला महिनाभराचा वेळ मिळाला आणि तो माझ्यासाठी पुरेसा होता.""यात अनेक व्हिडीओचा मी अभ्यास केला. चित्रपटातील अनेक सीन हे असेच्या असेच आहेत. पण त्यावेळी एक डोक्यात होतं की मला कोणाचीही मिमिक्री करायची नाही. जर मी मिमिक्री केली असती तर ते खूप फिल्मी झालं असते. जेव्हा आपण एखादा ऐतिहासिक चित्रपट करतो तेव्हा आपल्यासमोर पुस्तक हे एकच माध्यम असतं. पण इथे माझ्याकडे संपूर्ण व्हिडीओ होते. ज्याचा मला प्रचंड फायदा झाला", असे चिन्मय मांडलेकर म्हणाला. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात ‘बिट्टा’ साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला “हे फार चुकीचं…” विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली होती.