अभिषेक तेली
‘प्रेम’ म्हणजे तरुणाईच्या अगदी जिव्हाळय़ाचा विषय. सध्याच्या पिढीतील तरुण – तरुणी बेभानपणे प्रेमात रंगून जातात आणि निरनिराळय़ा पद्धतीने प्रेम हे आपल्या आवडत्या व्यक्तीजवळ व्यक्त करतात. पूर्वी पत्राच्या माध्यमातून प्रेमाचा संवाद साधला जायचा, आज मात्र ती जागा समाजमाध्यमांनी घेतली आहे. परिणामी प्रत्यक्ष भेटीतील गोडवा हरवत चालला आहे आणि आभासी जगामुळे प्रेमाच्या प्रवासात गैरसमजांचे ढग दाटू लागले आहेत. मालिका वा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमकथांचे लेखन करताना, दिग्दर्शन करताना तरुणाईच्या या बदललेल्या प्रेमाच्या परिभाषेचा विचार करावा लागतो का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम जरी बदलले असले, तरी भावना तशाच पूर्वीसारख्याच आहेत. कधी थोडय़ाशा हळव्या, प्रेमळ आणि अनेकदा रुसव्या-फुगव्यात अडकलेल्या प्रेमभावनाही आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेमकथा अनुभवताना, अनेकदा आजची तरुणाई त्या प्रेमकथेतील व्यक्तिरेखांमध्ये निश्चितच स्वत:ला शोधते आणि त्या कलाकारांप्रमाणे अनुकरणसुद्धा करते. त्यामुळे त्यांची प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे आणि स्वरूप बदललेले असले तरी प्रेमभावना मूळ तशीच असल्याने आताही लेखन वा दिग्दर्शन करताना ती प्रेमभावना लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याचाच प्रामुख्याने विचार केला जात असल्याचे मराठी मनोरंजनसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक सांगतात.
तरुण पिढीबरोबर चर्चा-संवाद महत्त्वाचे
‘प्रेम’ हे बदलत नसून, ते व्यक्त करण्याची भावना बदलते आहे. सध्याची पिढी ही तंत्रज्ञानाच्या जाळय़ात जास्त गुंतलेली आहे. मोबाइलने प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्याची माध्यमे बदलली आहेत. इमोजी व भेटवस्तूंमुळे संदेशाची व्याख्याच बदलली आहे. आताच्या तरुणाईला सर्वसाधारण गोष्टसुद्धा लक्षात ठेवून लिहावी लागते आहे. पूर्वी लिखित पत्रे, निनावी फोन, मित्र – मैत्रिणी ही प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे होती. प्रत्येक पिढीची एक भाषा व बदल असतो. यामुळे, काळानुसार आजूबाजूच्या गोष्टी बदलतात. पण भावना मात्र त्याच राहतात. यामुळे, कोणतीही कथा लिहिताना अवतीभोवतीचे बदल लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. आज ओटीटी माध्यमामुळे जगभरातील आशय हा घरबसल्या पाहायला मिळतो आहे. जग हे झपाटय़ाने पुढे जात असल्यामुळे, आपल्याला सगळय़ा गोष्टींमधून वेगळेपण राखावे लागते आणि त्यासाठी तरुण पिढीबरोबर चर्चा – संवाद करणे गरजेचे आहे. त्यांना नेमके काय आवडते, त्यांची भाषा काय आहे?, आवडते शब्द, गाणी, संगीत या सर्वच गोष्टींची सध्या काळजी घ्यावी लागते आहे. – सतीश राजवाडे, लेखक – दिग्दर्शक, अभिनेता
प्रेमाचे माध्यम बदलले, भावना नाही ..
सध्याची तरुणाई खूप बिनधास्त आणि मनमोकळेपणाने वावरते आहे, यावर माझा मुळीच विश्वास नाही. मला असे नेहमी वाटते की माझ्या आधीच्या दोन पिढय़ांचा काळ जास्त बिनधास्त होता, कारण तेव्हा समाजमाध्यमांचे जाळे पसरलेले नव्हते आणि या गोष्टीचा तरुणाईच्या मनावर तणाव नव्हता. सध्याच्या घडीला बिनधास्तपणाच्या सर्व मार्गाना खूप मर्यादा आली आहे. समाजमाध्यमांवर कोणतीही गोष्ट अपलोड करताना, आजच्या तरुणाईला त्याचा खोलवर विचार करावा लागतो. प्रेम ही एक कालातीत भावना असून ती काही बदलत नसते. फक्त काळानुसार प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलते. माझ्या लहानपणी प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील ‘कबुतर जा जा जा’ या गाण्यातून एखाद्याकडे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत व भावना त्या काळानुसार दाखवण्यात आली होती. आताच्या पिढीतील प्रेम हे कदाचित जास्त शारीर आहे, पण त्यामागची भावना बदलली आहे असे मला वाटत नाही. एखाद्या चित्रपट व मालिकेसाठी नवीन प्रेमकथा लिहिताना बदलत्या काळाचा विचार करावा लागतो. प्रेम ही भावना तशीच राहते, फक्त परिवेश बदलत राहतो. मी जेव्हा कॉलेजला होतो, तेव्हा रेल्वे स्टेशनवर अथवा बसस्टॉपवर उभे राहून एका मुलीची वाट बघण्याला रोमँटिकपणा मानला जायचा. आता समाजमाध्यमांवरच भावनांना जास्त वाट मोकळी करून दिली जाते, माझ्या मते ही काही मोठी गोष्ट नाही. सध्याच्या प्रेमकथेत टेक्स्ट मेसेजेस, इमोजी यातूनच जास्त प्रकटीकरण होते. यामुळे प्रेमाचे माध्यम जरी बदलले असले तरी, भावना मात्र तीच आहे. -चिन्मय मांडलेकर, लेखक – दिग्दर्शक, अभिनेता.
मनात भावभावनांचा हळवा कोपरा आहे
आजच्या तरुणाईची मानसिकता आणि विचार करण्याची क्षमता जरी वेगळी असली, तरी मात्र सर्वाच्या मनातील भावना या सारख्याच आहेत. सध्याच्या युगातील तरुण – तरुणी बेफिकिरीने व मनमोकळेपणाने वावरताना दिसत असले तरी मात्र त्यांच्या मनात भावभावनांचा एक हळवा कोपरा नक्कीच आहे. मी पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीचा विसर्जन सोहळा अनुभवला होता. या वेळी ढोल – ताशांच्या गजरात सगळे जण भान हरपून नाचत होते, पण गणपतीचे विसर्जन होताना मात्र मिरवणुकीत नाचणारे तरुण – तरुणी भावनिक झाले होते. लाडक्या गणपतीला निरोप देताना प्रत्येक जण अक्षरश: रडत होता. आमचे निर्माते पुनीत बालन यांच्या डोळय़ातही पाणी होते. यावरून, मला हे निश्चितच लक्षात आले की सध्याच्या तरुणाईमध्ये संवेदनशीलता आहे. यामुळे, प्रेमकथेतून मनोरंजन करत असताना त्याला भावनिक जोड दिल्यास ते तरुणाईच्या पसंतीस पडते आणि आपल्या प्रेक्षकांना कथेच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाशी निगडित व्यक्तिरेखा दिल्या, तर ते चित्रपटाशी लगेच जोडले जातात. – महेश लिमये, दिग्दर्शक – छायाचित्रणकार.