scorecardresearch

“राज ठाकरेंचा डंका…” मनसेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी चित्रपटाचं भारतातलं प्रदर्शन रद्द

हा चित्रपट ३० डिसेंबरला भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार होता.

“राज ठाकरेंचा डंका…” मनसेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी चित्रपटाचं भारतातलं प्रदर्शन रद्द

अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानतंर आता हा चित्रपट ३० डिसेंबरला भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी नुकतंच याबद्दल दोन ट्वीट शेअर केले आहेत. यात त्यांनी भारतात प्रदर्शित होणाऱ्या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. “राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानी सिनेमाला दणका. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचं प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही”, असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे.
आणखी वाचा : “पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही” मनसेचा थेट इशारा, म्हणाले “तोडफोड…”

“पुन्हा जर कुणाला पाकिस्तानी कलाकारांबद्दल प्रेमाचा उमाळा वगैरे आला तर त्यांच्यासाठी एवढा एक इशारा पुरेसा आहे. मनसे आंदोलनाच्या या विजयाबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”, असेही अमेय खोपकरांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट १३ ऑक्टोबरला पाकिस्तानसह जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाकिस्तानात चांगलीच पसंती मिळाली. विशेष म्हणजे जगभरातील अनेक प्रेक्षकांनी याचे कौतुक केले. ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा पाकिस्तानी चित्रपट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे.

हा चित्रपट ‘मौला जट्ट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात फवाद खान आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने अनेक भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केल्याचेही बोललं जात आहे. अनेक भारतीय प्रेक्षकांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करावा, अशी विनंती केली होती. या विनंतीनंतर हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र त्यानंतर त्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलून तो ३० डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मनसेने आक्रमक पावित्रा घेतला होता.

“पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दोन ट्वीट करत दिला होता.

थिएटरमालकांना नम्र आवाहन मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका”, असे ट्वीट करत मनसे नेते अमेय खोपकरांनी इशारा दिला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 10:41 IST

संबंधित बातम्या