अ‍ॅनिमेशनपटांकडे केवळ लहान मुलांचे चित्रपट म्हणूनच पाहिले जाते. भारतीय सिनेसृष्टीत कार्टून किंवा अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याची परंपरा नाहीच, परंतु जर कोणी असे चित्रपट पाहण्याचे धाडस करत असेल तर त्यात काय पाहण्यासारखे?, असा खोचक प्रश्न विचारून त्याला मागे खेचण्यातच धन्यता मानणारे अनेक तथाकथित बुद्धिजीवी चित्रपट समीक्षक आपल्या सभोवताली दिसतात. परंतु ‘टॉय स्टोरी’, ‘कोको’,‘अ‍ॅलिटा: बॅटल एंजेल’, ‘रॅटाटय़ुल’, ‘कुंग फू पांडा’, ‘अप’ यांसारख्या अनेक दर्जेदार अ‍ॅनिमेशनपटांनी या मंडळींचा वारंवार भ्रमनिरास केला आहे. या प्रयत्नांत डिस्ने कंपनी अग्रेसर आहे. गेल्या काही काळात त्यांनी ‘द इन्क्रेडिबल्स’, ‘राल्फ ब्रेक्स द इंटरनेट’, ‘ब्युटी अँड द बिस्ट’, ‘अल्लाउदीन’, ‘जंगल बुक’ असे सलग चित्रपट प्रदर्शित केले आहेत. त्यांचा हा नव्याने सुरू झालेला खटाटोप पाहिल्यावर ते जणू एखाद्या मोहिमेवरच असल्याचा भास होतो. डिस्नेने आपल्या जुन्या क्लासिक अ‍ॅनिमेशनपटांना पुन्हा एकदा लाइव्ह अ‍ॅक्शन फॉर्ममध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारात गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटाने विशेष लोकप्रियता मिळवली. ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या या चित्रपटाने अ‍ॅनिमेशनपटांना हिणवणाऱ्या समुदायास सणसणीत चपराक मारली असे म्हणता येईल, परंतु डिस्ने एवढय़ावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ‘द लायन किंग’ हा लाइव्ह अ‍ॅक्शनपट प्रदर्शित करून सिनेतंत्रज्ञान जगात आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या कार्टूनपटाची रिमेक आवृत्ती आहे. या चित्रपटातील सगळेच कथानक जुन्या चित्रपटावरूनच घेतले गेले आहे. ही कथा आहे सिम्बा नामक एका सिंहाची. सिम्बाचे वडिल मुफासा जंगलाचे राजा आहेत. मुफासा आणि त्याचा भाऊ  स्कार या दोघांमध्ये राजगादीबाबत काही मतभेद आहेत. पुढे या मतभेदांचे हाणामारीत रूपांतर होते. आणि राजा मुफासाची हत्या केली जाते. दरम्यान लहानगा सिम्बा मरता मरता वाचतो. आणि पुढे तो आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी व सिंहासन परत मिळवण्यासाठी आपल्या काकाला आव्हान देतो. ही पटकथा विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ या पुस्तकावर आधारित आहे.

डिस्नेने गेल्या काही काळात प्रदर्शित केलेल्या ‘ब्युटी अँड द बीस्ट’, ‘अल्लाउदीन’ आणि ‘जंगल बुक’ या चित्रपटांमध्ये आपण सीजीआय तंत्रज्ञानाची कमाल पाहिली आहे. खरे तर या चित्रपटांमधील मोजकाच भाग सीजीआयच्या मदतीने तयार केला गेला होता. तरीही या चित्रपटांनी सिनेजगतात चांगलीच खळबळ माजवली. परंतु ‘द लायन किंग’ची तंत्रज्ञानाच्या बाबतीत आजवर प्रदर्शित झालेल्या कुठल्याच अ‍ॅनिमेशनपटाशी तुलना करता येणार नाही. हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर आहे. कारण हा संपूर्ण चित्रपट सीजीआय तंत्रज्ञानावरच तयार करण्यात आला आहे. या चित्रपटातील एकही क्षण कॅमेऱ्याने चित्रित केलेला नाही. अगदी गवताच्या पातीपासून प्राण्यांच्या हावभावापर्यंत सर्व काही संगणकावरच तयार करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘द लायन किंग’ने सिनेतंत्रज्ञानात जणू क्रांतीच केली आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात याचे संपूर्ण श्रेय पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना व त्यांच्याकडून योग्य रितीने काम करून घेणाऱ्या दिग्दर्शक जॉन फेवेरु यांना जाते. हा चित्रपट पाहताना पहिला अर्धा तास आपण डोळे विस्फारून पहातच राहतो. आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही इतके उत्कृष्ट काल्पनिक चित्रीकरण यांत दाखवण्यात आले आहे. सीजीआय म्हणजेच कॉम्प्युटर जनरेटेड इमेजिरी हे या चित्रपटाचे खरे वैशिष्टय़ आहे असे म्हणता येईल.

१ तास ५८ मिनिटांचा ‘द लायन किंग’ हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. इंग्रजीमध्ये चिवेताल एहीओफो, जॉन ऑलीव्हर, जेम्स अर्ल जोन्स, जॉन कानी, जेडी मॅक्कॅरी, डोनाल्ड ग्लोव्हर या कलाकारांनी त्यातील प्राण्यांना आवाज दिला आहे. तर हिंदीमध्ये शाहरुख खान, आर्यन खान, आशीष विद्यार्थी, श्रेयस तळपदे, असरानी, संजय मिश्रा यांनी आवाज दिला आहे. संजय मिश्रा व श्रेयस तळपदे या दोघांचा आवाज सोडला तर इंग्रजीच्या तुलनेत हिंदी डबिंग बरेचसे बनावट वाटते. शाहरुख खान व त्याचा मुलगा आर्यन खान याने मुफासा व सिम्बा यांना आवाज दिला आहे. चित्रपटात एकूण ११ गाणी आहेत. इंग्रजीमधील ही सर्व गाणी जुन्या लायन किंगमधील गाण्यांचीच रिमेक आवृत्ती आहेत. हिंदी डबिंगमध्ये या सर्व गाण्यांचे भाषांतर करण्यात आले आहे. अर्थात हे भाषांतर बरेचसे रुचणारे नाही, कारण यांतील ऱ्हिदम इंग्रजी गाण्यांच्या आसपासही जात नाही.

ज्या प्रेक्षकांनी १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘द लायन किंग’ हा कार्टूनपट पाहिला आहे. त्यांच्यासाठी यात पाहण्यासारखे फक्त स्पेशल इफेक्ट आहेत. कारण दोन्ही चित्रपटांमधील कथानक, पात्र, गाणी, ड्रामा, संभाषण, अ‍ॅक्शन सीन्स सर्व काही सारखेच आहेत. फक्त यांत वापरण्यात आलेले सीजीआय तंत्रज्ञान या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेते. परंतु ज्या प्रेक्षकांनी आधीचा लायन किंग पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे त्यांनी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नक्कीच ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lion king live action movie mppg
First published on: 27-07-2019 at 22:46 IST