शाळेत किंवा महाविद्यालयातील मित्रमैत्रीण कालांतराने काम आणि जबाबदारीमुळे हळूहळू दूर होत जातात. त्यानंतर मोबाइलद्वारे एकमेकांची माहिती घेणं एवढाच संवाद त्यांच्यात उरतो. पण, या मित्रमैत्रिणींचा अचानक पुनर्भेटीचा बेत जुळून येतो. आणि दुरावलेली ही मंडळी वयाच्या, आयुष्याच्या एका वेगळय़ा टप्प्यावर पुन्हा एकत्र येतात. अशाच अचानक झालेल्या भेटीत उलगडलेल्या मैत्रीच्या वेगवेगळय़ा पैलूंवर आधारित ‘मुसाफिरा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना या चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे, स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला हा पहिला चित्रपट भारतीय चित्रपट आहे. पुष्कर जोग निर्मित आणि दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज चिरपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने दिग्दर्शक पुष्कर जोगसह अभिनेत्री पूजा सावंत, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

‘मुसाफिरा’ चित्रपटाचं दिग्दर्शन, अभिनय अशा बहुविध आघाडय़ा सांभाळणारा अभिनेता पुष्कर जोग म्हणाला, ‘‘मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसमोर दर्जेदार काम सादर करायचं होतं. टाळेबंदीच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. करोनामुळे टाळेबंदी झालेली असतानाच्या काळात मी माझ्या काही जिवलग मित्रांना गमावलं, त्यामुळे मला मोठा धक्का बसला होता. हे तंत्रज्ञानाचं युग असलं तरी आपण आपल्या लोकांपासून लांब जात आहोत. आयुष्यात मैत्री किती महत्त्वाची आहे. लांब जाणारी ही नाती वेळीच सांभाळणं किती महत्त्वाचं आहे हे ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं आहे.’’ मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचंही त्याने सांगितलं.

Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Thakur College viral video
मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध महाविद्यालयात पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, ओळखपत्र जप्त करून…
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा >>>मृणाल कुलकर्णींनी दिल्या खास ब्यूटी टीप्स; त्यांच्या आवडत्या मेकअपच्या तीन वस्तूंचं नाव घेत म्हणाल्या…

‘मुसाफिरा’च्या माध्यमातून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करताना कोणती आव्हानं समोर होती याबद्दल बोलताना पुष्कर म्हणाला, ‘मुळात या तिन्ही जबाबदाऱ्या एकावेळी पेलणं फार कठीण होतं आणि मला खरं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं नव्हतं. पण मला माझ्या सहकलाकारांनी खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ही जबाबदारी पेलणं सोपं झालं.’ मराठीतील काही दिग्दर्शक आजही जुन्या पद्धतीने चित्रीकरण करून चित्रपट बनवू पाहतात, पण आजच्या काळातील युवा पिढीला त्यांच्या मोबाइलच्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट घरबसल्या बघता येतात, त्यामुळे आपले चित्रपटही त्यांचे लक्ष वेधून घेण्याइतके उत्तम असले पाहिजेत, हाही एक महत्त्वाचा विचार मनात होता असंही त्याने सांगितलं.

हिंदी आणि मराठी दोन्हीकडे मोजक्या पण चांगल्या चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री पूजा सावंत बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल आणि पुष्कर जोगच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याबद्दलच्या आपल्या अनुभवाविषयी ती मनमोकळेपणाने बोलली. ‘पुष्कर हा माझा फार जुना मित्र आहे. तो उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहेच, पण या चित्रपटामुळे तो एक उत्तम निर्माता आहे हेदेखील समजलं. आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या निर्मात्यांची गरज आहे. आपल्याकडे खूप चांगले विषय आहेत, ते पेलण्याची क्षमता असलेले कलाकार आहेत, मात्र हे विषय आणि कलाकार पुढे यावेत यासाठी निर्मात्यांचीदेखील गरज असते. नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या निर्मात्यांपैकी पुष्कर एक आहे, असं पूजाने सांगितलं. तसंच, या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही खूप जास्त साहसी मोहिमा केल्या आहेत, असं सांगतानाच या चित्रपटासाठी पाचही कलाकारांनी स्काय डायिव्हग केल्याची माहिती तिने दिली. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर आम्ही चित्रीकरण केलं तेव्हा त्या टोकावर जाण्यापासून तिथे अन्य कामं करण्यासाठीही आम्ही एकमेकांना मदत केली, त्यामुळे पडद्यामागे आमच्यात तयार झालेलं हे मैत्रीचं नातं चित्रपटातही तितकंच खुललेलं प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

हेही वाचा >>>“आपलं आरोग्य चांगलं नसेल तर…”, आजारपणानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी भोगलंय…”

नेहमी विनोदी भूमिकांमधून दिसणाऱ्या अभिनेता पुष्कराज चिरपुटकरनेही या चित्रपटातील आपला अनुभव सांगितला. ‘कलाकाराला नेहमी वेगवेगळय़ा पद्धतीचं काम करता यायला हवं. तसंच वेगवेगळय़ा लोकांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळायला हवी, त्यामुळेच आपल्याला एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळतं. या चित्रपटासाठी मला जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा मला वाटलं मी या कलाकारांबरोबर कधी काम केलेलं नाही आणि मी जे काम केलं आहे त्यापेक्षा वेगळं काम करण्याची ही संधी आहे तर नक्कीच मी हे केलं पाहिजे. या चित्रपटात जसा मैत्री उलगडण्याचा प्रवास दाखवण्यात आलं आहे, तसं वास्तवात आमच्यातील मैत्रीच्या प्रवासाचाही अनुभव या चित्रपटाशी जोडला गेला आहे’, असं पुष्कराजने सांगितलं.

‘पुष्करने मला जेव्हा हा चित्रपट एक प्रवास कथा आहे असं सांगितलं तेव्हा मी महाराष्ट्रात किंवा फार फार भारतात असेल असा अंदाज बांधला होता, पण जेव्हा हा चित्रपट स्कॉटलँडला चित्रित करणार आहोत हे सांगितलं. त्यावेळी मला खूप आनंद झाला’, अशी भावना अभिनेत्री दिशा परदेशी हिने व्यक्त केली.

‘एकमेकांचा आदर करायला हवा’

मराठी कलाकार एकमेकांचा आदर करण्यात कमी पडतात या राज ठाकरेंच्या मताला दुजोरा देत पुष्करने आपलाही अनुभव सांगितला. ‘मराठी चित्रपटसृष्टीत कलाकार एकमेकांना वैयक्तिक आणि कामाच्या दृष्टीनेदेखील आदर द्यायला कमी पडतात. एकमेकांबद्दल ईष्र्या वाढत चालली आहे. त्यामुळे आपणच आपल्या सोबत असलेल्या कलाकारांचे पाय खेचतो आहोत हे लक्षातच येत नाही’ याकडे त्याने लक्ष वेधलं. इतर चित्रपटसृष्टीत एकमेकांचा आदर केला जातो. तसा आपल्या चित्रपटसृष्टीतही केला गेला पाहिजे. जर एखाद्या निर्मात्याने आपल्या चित्रपटाची तारीख जाहीर केली, तर त्याचा आदर राखत संबंधित तारखेला दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही यासाठीही काळजी घेतली पाहिजे. मराठी चित्रपट न चालण्यामागे हे एक फार मोठं कारण असतं, असं पुष्करने सांगितलं. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. एकाच दिवशी सगळे चित्रपट मराठी प्रेक्षक बघू शकत नाहीत. त्यामुळे तारखेच्या बाबतीत विचारपूर्वक निवड व्हायला हवी, असं मत त्याने व्यक्त केलं.

एखाद्या पुरस्कार सोहळय़ात कलाकारांची मस्करी केली जाते तेही अयोग्य असल्याचा आक्षेप त्याने घेतला. त्यामुळे नकळत त्या कलाकारांचा अपमान होता असतो. असे अनेक मोठे पुरस्कार सोहळे प्रेक्षक आपल्या घरी पाहत असतात. त्यामुळे त्यावेळी प्रेक्षकांनादेखील वाटतं आपणदेखील या कलाकाराची अशी खिल्ली उडवू शकतो, त्यामुळे आधी आपण एकमेकांचा आदर केला तरच आपल्यात एकता दिसेल असं मत अभिनेत्री पूजा सावंतने व्यक्त केलं.

संकलन : श्रुती कदम